मेन राजाराम प्रशालेत विद्यार्थ्यांनी केले पसायदानाचे सामूहिक वाचन
schedule14 Aug 25 person by visibility 147 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : येथील समृद्ध शैक्षणिक इतिहासाचे सोनेरी पान असणाऱ्या जिल्हा परिषद संचलित मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वरीतील पसायदानाचे सामूहिक वाचन केले.
महाराष्ट्राला संत परंपरेचा खूप मोठा वारसा व जाज्वल्य इतिहास लाभला आहे. संतांचे विचार, संस्कार व नैतिक मूल्य हेच महाराष्ट्राच्या प्रगतीचे अधिष्ठान आहे. विश्व माऊली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे सन २०२५ हे वर्ष सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी (७५०) जयंती वर्ष आहे. यापार्श्वभूमीवर सन २०२५ हे वर्ष महाराष्ट्रात 'माऊलींचे महोत्सव वर्षे' म्हणून साजरी होत आहे. या अंतर्गत महाराष्ट्रात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
“गोकुळ अष्टमीला" अर्थातच १५ ऑगस्ट रोजी संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराजांची ७५० वी जयंती आहे. संत ज्ञानेश्वरांच्या 'पसायदान' या अमृतवाणीच्या सामूहिक पठणातून विद्यार्थ्यांमध्ये सद्भाव, सहिष्णुता व आध्यात्मिक जाणीव वाढविण्यासाठी प्रशालेचे प्राचार्य डॉ गजानन खाडे यांच्या अध्यक्षतेखाली पसायदानाचे सामूहिक वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रशालेतील प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक यांच्या सहित ७४९ विद्यार्थ्यांनी पसायदानाचे सामूहिक वाचन केले. अखिल सजीवस्रुष्टीच्या कल्याणासाठी संत ज्ञानेश्वर माऊलींनी वैश्विक सद्भावनेचा साक्षात्कार असणाऱ्या पसायदानाचे प्रत्यक्ष सामूहिक वाचनाचा अनुभव मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.