डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर; डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डबेवाल्यांना दिलासा
schedule14 Aug 25 person by visibility 84 categoryराज्य

मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला डबेवाला समाजासाठी ऐतिहासिक घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५०० चौरस फुटांचे घर केवळ २५.५० लाख रुपयांत उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर शासकीय योजनांच्या माध्यमातून हा परवडणारा गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वांद्रे पश्चिम येथे ‘डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रा’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी डबेवाल्यांना कमी किमतीत घरे उपलब्ध होणार असल्याची घोषणा केली.
यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार श्रीकांत भारतीय, योगेश सागर, तमिळ सेल्वन यांच्यासह नूतन मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर चॅरिटी ट्रस्ट चे अध्यक्ष उल्हास मुके, मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष रामदास करवंदे, सचिव किरण गवांदे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, १३५ वर्षांच्या प्रवासात आमचे डबेवाले संगणक किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स न वापरता मानवी बुद्धिमत्तेच्या जोरावर जगप्रसिद्ध व्यवस्थापन कौशल्य दाखवत आले आहेत. एकही चूक न करता, एकही दिवस उशीर न करता त्यांनी काम केले. ही जगातली अद्वितीय परंपरा आहे. ‘डबेवाला भवन’ चे रूपांतर आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रात झाल्यामुळे आणि येथे व्हर्च्युअल रिॲलिटीच्या माध्यमातून सकाळच्या भजनापासून लोकल प्रवास, डबे वितरित करणे आणि जेवणापर्यंत असा डबेवाला संस्कृतीचा थेट अनुभव घेता येत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. डबेवाला समाजाची निर्व्यसनी, वारकरी परंपरेवर आधारित सेवा ही जगभरासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढील काळात या केंद्रासाठी अधिक चांगल्या सुविधा आणि उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी डबेवाल्यांच्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करून देणारे त्रिपाठी यांचे, तसेच नफा न घेता उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम करण्याची जबाबदारी स्वीकारणारे जयेश शाह आणि संपूर्ण टीमचे विशेष कौतुक केले. सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करून आज या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.