SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्ह्यात 26 ऑक्टोबरपर्यंत बंदी आदेश लागूपोलीस स्मृती दिनी पोलीस हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून वाहणार श्रद्धांजलीशिवसेना नगरसेवक आक्रमक; विविध मागण्यांसाठी आयुक्तांना निवेदन!सखोल वैद्यकीय ज्ञान घेऊन आदर्श डॉक्टर बना : डॉ. संजय डी. पाटीलसीपीआरमध्ये कवटीच्या तळाशी संबंधित अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया पहिल्यांदाच यशस्वीधरणगुत्तीत आरोग्य शिबिरात ५३० नागरिकांची तपासणीसेवा संकल्प अभियानांतर्गत १६ हजार ६८३ दाखल्यांचे वितरणकोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव : १३ ऑक्टोबर रोजी पर्यटक व नागरिकांना 'कोल्हापूर चित्रनगरीची विनामूल्य सफर'संजय घोडावत विद्यापीठाचा १६ ऑक्टोबरला दीक्षांत समारंभ राष्ट्रीय मानवाधिकार आयोग: स्थापना, कार्य आणि महत्त्व

जाहिरात

 

शिवसेना नगरसेवक आक्रमक; विविध मागण्यांसाठी आयुक्तांना निवेदन!

schedule12 Oct 26 person by visibility 267 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या विविध नागरिक समस्या, अतिक्रमण कारवाईतील दुजाभाव, ऐन दिवाळीच्या तोंडावर विस्कळीत झालेला पाणीपुरवठा, परवाना विभागाची दडपशाही, फेरीवाल्यांचे पुनर्वसन आणि जन्म-मृत्यू दाखले मिळण्यात होत असलेला प्रचंड विलंब या गंभीर मुद्द्यांवर शिवसेना कोल्हापूर (दक्षिण) विधानसभा प्रमुख तथा नगरसेवक  शारंगधराज वसंताराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका आयुक्तांना  निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधून घेत तातडीने योग्य निर्णय घेण्याची आक्रमक मागणी करण्यात आली आहे.

◼️अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत हवी पारदर्शकता आणि समानता
निवेदनात नमूद करण्यात आल्यानुसार, महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून रंकाळा परिसरातील फेरीवाल्यांवर वेळोवेळी कारवाई केली जात असली, तरी शहरातील इतर विभागांमध्ये अशा प्रकारच्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष होते किंवा समान निकषांनुसार कारवाई होत नाही. कोणत्याही व्यावसायिक किंवा फेरीवाल्याबाबत दुजाभाव झाल्याचा आरोप होऊ नये, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने शहरातील सर्व विभागांमध्ये अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम एकाच व समान निकषांनुसार राबवणे अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

◼️दिवाळी सणात पाणीटंचाई नको; एक दिवस आड सुरळीत पाणीपुरवठा हवा
सध्या कोल्हापूर शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः दिवाळी आणि इतर सणासुदीच्या काळात घरोघरी स्वच्छता, फराळाची तयारी, धार्मिक कार्यक्रम तसेच दैनंदिन वापरासाठी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. अशा परिस्थितीत ऐन दिवाळीत नागरिकांचे हाल होऊ नयेत म्हणून पाणीपुरवठ्यातील अनियमितता दूर करून सणासुदीचे दिवस संपेपर्यंत नियमित किंवा योग्य नियोजनानुसार पाणीपुरवठा करावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. तसेच जे अनधिकृत नळ कनेक्शन धारक आहेत, त्यांना २५,००० रुपये दंड व १०,००० रुपये अनामत भरून कनेक्शन अधिकृत करून घेत असताना त्यांना सवलतीच्या दरात पाणी कनेक्शन देण्याची व्यवस्था करावी, असेही सुचवण्यात आले आहे.

◼️परवाना विभागाच्या कारवाईत नको अडेलतट्टू व दडपशाही धोरण
महानगरपालिकेच्या परवाना विभागामार्फत शहरातील व्यापारी व व्यावसायिकांवर विविध कारणांवरून स्कॉडद्वारे मनमानी पद्धतीने कारवाई केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून व्यावसायिकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने कायद्याचे पालन करताना संबधित नियम व कायदेशीर तरतुदीनुसार, पारदर्शक पद्धतीने आणि कोणतीही दडपशाही न करता कारवाई करणे गरजेचे आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित व्यावसायिकाला पूर्वकल्पना म्हणून नोटीस देणे, त्यांची बाजू ऐकून घेणे आणि आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित आहे.

◼️फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र 'फेरीवाला झोन'ची तातडीने निर्मिती करा
कोल्हापूर शहरात अनेक फेरीवाले लहान-मोठे व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. विशेषतः दिवाळीच्या काळात त्यांना व्यवसायाच्या माध्यमातून उत्पन्नाची मोठी अपेक्षा असते. मात्र, शहरात फेरीवाल्यांसाठी कोणतीही निश्चित व नियोजित जागा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना दररोज अपमानास्पद व दळणवळणाच्या अडचणींचा सामना करावा लागतो. फेरीवाल्यांच्या उपजीविकेचा आणि त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा विचार करून, तसेच शहरातील वाहतूक व्यवस्थेला कोणताही बाधा न आणता प्रशासनाने स्वतंत्र व नियोजित 'फेरीवाला झोन' त्वरित निश्चित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

◼️जन्म व मृत्यू दाखल्यांसाठी महिनोन्‌महिने प्रतीक्षा नको; QR कोडयुक्त दाखले तत्परतेने द्या
सध्या महानगरपालिकेतून जन्म व मृत्यूचे QR कोडयुक्त दाखले वेळेत उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांना तब्बल एक-एक महिना ताटकळत राहावे लागत आहे. जन्म व मृत्यूचे दाखले हे शैक्षणिक प्रवेश, शासकीय योजना, वारस नोंद, विमा, मालमत्ताविषयक कामे आणि इतर प्रशासकीय कामांसाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज असतात. दाखले वेळेत मिळत नसल्याने नागरिकांची महत्त्वाची कामे रखडत असून त्यांना वारंवार कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला असून, जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील अपुरे मनुष्यबळ व तांत्रिक अडचणी दूर करून निश्चित कालावधीत दाखले उपलब्ध करून देण्याची ठोस व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सदर विषयाच्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय निर्णय हे आचारसंहिता संपल्यानंतर तत्काळ अमलात आणून योग्य तो न्याय दिला जावा,

या महत्त्वाच्या आणि सर्वसमावेशक निवेदनावर कोल्हापूर महानगरपालिकेचे विविध प्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील व्यक्ती उपस्थित होत्या:
  अक्षय जरग (उप-महापौर), शारंगधराव वसंताराव देशमुख (नगरसेवक तथा शिवसेना दक्षिण विधानसभा प्रमुख),  सत्यजित चंद्रकांत जाधव, श्रीमती अनुराधा सचिन खेडकर,  प्राजक्ता अभिषेक जाधव,  मंगल महादेव साळोखे, स्वरुप सुजित कदम,  अभिजित शामराव खतकर,  वैभव दिलीप माने,  कौसर इस्माईल बागवान,  संगिता सं. सावंत,  शिला अशोक सोनुले,  अर्चना उमेश पागर,  ऋतुराज राजेश क्षीरसागर,  अजय पांढरंग इंगवले, आशिकिन गणी अजरेकर,  प्रसाद सुजित चव्हाण.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes