सेवा संकल्प अभियानांतर्गत १६ हजार ६८३ दाखल्यांचे वितरण
schedule12 Oct 26 person by visibility 259 categoryराज्य
◼️जिल्ह्यात ८ हजार ३७९ वृक्षांची लागवड; श्रमदानात २७ हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग
कोल्हापूर : सेवा संकल्प अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायत स्तरावर विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात आले. या माध्यमातून जिल्ह्यातील लाभार्थ्यांना एकूण १६ हजार ६८३ दाखल्यांचे वितरण करण्यात आले. तसेच ६१० ग्रामपंचायतींमध्ये ८ हजार ३७९ वृक्षांची लागवड करण्यात आली.
गावांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व १ हजार २६ ग्रामपंचायतींमध्ये श्रमदान उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतून सार्वजनिक स्वच्छता, परिसराचे सुशोभीकरण आणि सामाजिक कार्यातील नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात आला.
जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या या विविध उपक्रमांमध्ये एकूण २७ हजार ५४८ नागरिकांनी सहभाग नोंदविला. शासकीय दाखल्यांचे वितरण, वृक्षारोपण आणि श्रमदान अशा उपक्रमांच्या माध्यमातून सेवा संकल्प अभियानाने ग्रामविकास, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभागाला चालना दिली.