SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्ह्यात 26 ऑक्टोबरपर्यंत बंदी आदेश लागूपोलीस स्मृती दिनी पोलीस हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून वाहणार श्रद्धांजलीशिवसेना नगरसेवक आक्रमक; विविध मागण्यांसाठी आयुक्तांना निवेदन!सखोल वैद्यकीय ज्ञान घेऊन आदर्श डॉक्टर बना : डॉ. संजय डी. पाटीलसीपीआरमध्ये कवटीच्या तळाशी संबंधित अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया पहिल्यांदाच यशस्वीधरणगुत्तीत आरोग्य शिबिरात ५३० नागरिकांची तपासणीसेवा संकल्प अभियानांतर्गत १६ हजार ६८३ दाखल्यांचे वितरणकोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव : १३ ऑक्टोबर रोजी पर्यटक व नागरिकांना 'कोल्हापूर चित्रनगरीची विनामूल्य सफर'संजय घोडावत विद्यापीठाचा १६ ऑक्टोबरला दीक्षांत समारंभ राष्ट्रीय मानवाधिकार आयोग: स्थापना, कार्य आणि महत्त्व

जाहिरात

 

सीपीआरमध्ये कवटीच्या तळाशी संबंधित अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया पहिल्यांदाच यशस्वी

schedule12 Oct 26 person by visibility 173 categoryआरोग्य

◼️वैद्यकीय सेवेमध्ये रुग्णालयाची ऐतिहासिक कामगिरी
         
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या (सीपीआर) न्यूरोसर्जरी विभागाने वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय आणि ऐतिहासिक यश मिळवले आहे. रुग्णालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच कवटीच्या तळाशी संबंधित अत्यंत गुंतागुंतीच्या दोन अत्याधुनिक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. 
              
शस्त्रक्रियेनंतर संबंधित रुग्णांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली. तसेच; सीपीआर प्रशासनाचे व डॉक्टरांचे मनापासून आभार मानले. सीपीआरच्या या यशामुळे आता कोल्हापूरसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील सर्वसामान्य रुग्णांना अशा महागड्या आणि अत्याधुनिक न्यूरोसर्जिकल उपचारांसाठी खासगी रुग्णालयांवर अवलंबून न राहता शासकीय रुग्णालयातच उच्च दर्जाची सुविधा उपलब्ध झाली आहे.  
           
या मोहिमेत एंडोस्कोपिक एंडोनेझल ट्रान्सस्फेनॉइडल पद्धतीद्वारे नाकाच्या मार्गाने जाऊन पिट्युटरी ट्युमर काढण्याची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाली. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे पारंपरिक पद्धतीप्रमाणे कवटी उघडण्याची (क्रेनियोटॉमी) गरज भासत नाही, ज्यामुळे रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर होणारा त्रास अत्यंत कमी होतो व ते जलद गतीने बरे होतात. 
        
दुसऱ्या एका क्लिष्ट प्रकरणात एथमोइड सायनसमधून मेंदू व कवटीच्या तळाकडे विस्तारलेला फंगल बॉल अत्यंत कौशल्याने आणि सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आला. 
​             
या दोन्ही महत्त्वपूर्ण शस्त्रक्रिया न्यूरोसर्जरी विभागाचे डॉ. तेजस कामत यांनी स्वतः पार पाडल्या. त्यांना कान, नाक व घसाशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. वासंती पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 
​             
या यशाबद्दल बोलताना डॉ. तेजस कामत म्हणाले, "शासकीय रुग्णालयात अशा प्रकारच्या अत्याधुनिक व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी होणे ही संपूर्ण संस्थेसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. योग्य नियोजन, आंतरविभागीय समन्वय आणि तज्ज्ञांच्या सहकार्यामुळेच हे यश साध्य झाले." 

​या ऐतिहासिक कामगिरीसाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री  हसन मुश्रीफ यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र मदने, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीष कांबळे, शल्यचिकित्सा विभागप्रमुख डॉ. वसंत देशमुख आणि कान, नाक व घसाशास्त्र विभागप्रमुख डॉ. अजित लोकरे यांच्यासह भूलशास्त्र विभाग, क्ष-किरण विभाग आणि परिचारिका कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes