उदगावच्या कुंजवन जैन मंदिराला ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त
schedule07 Nov 26 person by visibility 80 categoryराज्य
◼️आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नांना यश;उदगावच्या धार्मिक आणि पर्यटन विकासाला मिळणार चालना
उदगाव : शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या कुंजवन जैन मंदिराला महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना (ब वर्ग) अंतर्गत ‘ब’ वर्ग यात्रास्थळाचा दर्जा मंजूर झाला आहे. ग्रामविकास विभागाने याबाबतचा अधिकृत शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. या निर्णयामुळे मंदिराच्या सर्वांगीण विकास होणार असून उदगावच्या धार्मिक आणि पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
कुंजवन जैन मंदिर हे जैन समाजाचे महत्त्वपूर्ण धार्मिक श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी पंचकल्याणक महोत्सवासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशा कार्यक्रमांसाठी हजारो भाविक आणि जैन बांधव उपस्थित राहतात. त्यामुळे या यात्रास्थळाला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळावा, अशी मागणी मंदिर ट्रस्टच्या वतीने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे केली होती. याबाबतचा प्रस्ताव देखील त्यांनी दिला होता.
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शासनाकडे याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. शासन निर्णयाद्वारे कुंजवन जैन मंदिराला ‘ब’ वर्ग यात्रास्थळाचा दर्जा मंजूर झाला आहे.
या दर्जामुळे मंदिर परिसरातील पायाभूत सुविधा, भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा आणि परिसराच्या विकासाला मोठे बळ मिळणार आहे. तसेच मंदिराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास होणार आहे. त्यामुळे भाविकांची सोय होण्याबरोबरच उदगावच्या धार्मिक पर्यटनालाही चालना मिळणार आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानले आहेत.