मुंबईच्या मेट्रोत वारणा ब्रँडचा विस्तार/गिरगाव स्थानकात विक्री केंद्राचे उदघाटन
schedule07 Nov 26 person by visibility 100 categoryउद्योग
मुंबई : मुंबईतील मेट्रो प्रवाशांना दर्जेदार दूध व दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या वतीने गिरगाव मेट्रो स्थानक येथे नव्या विक्री केंद्राचे उद्घाटन नियोजन रिअल इस्टेट विकास/एन.एफ.बी.आरचे संचालक श्री आर. रमना यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटनप्रसंगी रमना म्हणाले वारणा दूध संघाची व्यवसायात ग्राहकांच्या विश्वासार्हतेणे वेगाने विस्तार होत आहे.कमी वेळेत मेट्रो स्टेशन येथे विक्री केंद्र चालू करून व्यवसाय वाढीचा वेग वारणाने वाढविला असल्याचे त्यांनी सांगितले.मुंबई मेट्रो ही ग्रामीण भागातील कृषी व दुग्धजन्य उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देणारे व वारणेच्या उत्पादनांच्या विक्री वृद्धीचे प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.
वारणा समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे यावेळी म्हणाले मेट्रो स्थानकांवरील विक्री केंद्रांमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची उत्पादने थेट शहरी ग्राहकांपर्यंत पोहोचतील. येणाऱ्या काळात या मेट्रो स्टेशन विक्री केंद्रावर स्वयंचलित विक्री यंत्रणा बसविणे व वारणेचे नमकीन स्नॅक्स पदार्थ विक्रीस ठेवणाचा वारणा दूध संघाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
वारणा दूध संघाच्या मुंबईतील बाजारपेठ विस्ताराच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. या विक्री केंद्राच्या माध्यमातून मुंबईकर तसेच मेट्रो प्रवाशांना वारणा दूध संघाची विविध दूध व दुग्धजन्य उत्पादने सहज उपलब्ध होणार आहेत. वारणा दूध, तूप, श्रीखंड, पनीर, दही, ताक यांसह विविध उत्पादनांना मुंबईच्या ग्राहकांपर्यंत थेट पोहोचण्याची संधी यामुळे निर्माण झाली आहे.
यापूर्वी १६ जून २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मेट्रो स्थानक येथे वारणा दूध संघाच्या पहिल्या विक्री केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते. सीएसएमटी विक्री केंद्रास ग्राहकाचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या दुधापासून तयार होणाऱ्या दर्जेदार उत्पादनांना मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेत स्थान मिळावे, हा या विक्री केंद्राचा प्रमुख उद्देश आहे. सीएसएमटी येथील विक्री केंद्रानंतर आता गिरगाव मेट्रो स्थानक येथेही विक्री केंद्र सुरू झाल्याने वारणा ब्रँडच्या मुंबईतील विस्ताराला नवी दिशा मिळणार आहे. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी निर्माण केलेली उत्पादने थेट महानगरातील ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा वारणा दूध संघाचा हा उपक्रम दुग्धव्यवसायाच्या बाजारपेठ विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
यावेळी नगर नियोजन विभागाचे उप महाव्यवस्थापक श्वेतल कानवालू,
सहायक महाव्यवस्थापक फरहा इराणी, उप नगर नियोजक माधुरी जावळे,
व इतर अधिकारी वर्ग संघाचे अध्यक्ष एच. आर. जाधव,उपाध्यक्ष ॲड. एन. आर. पाटील,कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर, संचालक मंडळ उपस्थित होते. सूत्रसंचालन वाशी शाखा प्रमुख एन बी धमाल व आभार प्रदर्शन मुंबई मार्केटिंग प्रमुख ए.के.सिंग यांनी केले.