किणी-हंदळेवाडीत शेततळ्यात बुडून तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू; आरोग्य सुविधेअभावी ग्रामस्थांचा संताप
schedule25 May 26 person by visibility 62 categoryगुन्हे
कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील किणी-हंदळेवाडी येथे सोमवारी दुपारी शेततळ्यात बुडून तीन अल्पवयीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. धनुष्का पुंडलिक सांबरेकर (हुंदळेवाडी), स्वराली जयवंत नाईक (होसुर) आणि रिया चंद्रकांत सांबरेकर (हुंदळेवाडी) अशी मृत मुलींची नावे आहेत.
शेततळ्याकाठी खेळत असताना हा अपघात घडला. सायंकाळी एका व्यक्तीला तिथे एक लहान मुलगा एकटाच उभा असलेला दिसला, त्यानंतर शोध घेतला असता तिन्ही मुली पाण्यात बुडाल्याचे समोर आले. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, या दुर्घटनेमुळे स्थानिक आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कोवाड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असूनही तिथे शवविच्छेदनाची (पोस्टमार्टम) सुविधा उपलब्ध नाही. यामुळे मृतदेह तब्बल ३० किलोमीटर दूर असलेल्या चंदगड ग्रामीण रुग्णालयात न्यावे लागले. या दुरवस्थेमुळे शोकाकुल नातेवाईकांना प्रचंड मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला.
कोवाडसारख्या मध्यवर्ती ठिकाणी तातडीने पोस्टमार्टम सुविधा सुरू करावी, अशी तीव्र मागणी आता ग्रामस्थांमधून केली जात आहे.