चालुक्याज स्पोर्ट्स अकॅडेमीकडून धनुर्विद्या चॅम्पियनशिपचे दिमाखात आयोजन; खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद
schedule25 May 26 person by visibility 159 categoryक्रीडा
कोल्हापूर : चालुक्याज स्पोर्ट्स अकॅडेमीच्या वतीने आयोजित 'चालुक्याज क्रीडा महोत्सव २०२६' अंतर्गत धनुर्विद्या चॅम्पियनशिप स्पर्धा रविवारी, दिनांक २४ मे २०२६ रोजी न्यू पॅलेस शेजारील नागाळा पार्क येथील श्री दत्त स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, पुंगावकर मळा येथे अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. क्रीडा क्षेत्रात शिस्त, गुणवत्ता वाढीस लावणे आणि नवोदित खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी खेळाडूंकडून कोणताही प्रवेश शुल्क न घेता प्रवेश पूर्णतः मोफत ठेवण्यात आला होता. रविवारी सकाळी ९ वाजल्यापासूनच खेळाडूंची रिपोर्टिंगसाठी गर्दी सुरू झाली होती, तर सकाळी १०:३० वाजता प्रत्यक्षात स्पर्धांना सुरुवात झाली.
या स्पर्धेमध्ये एकूण ४५ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला.
आर्चरी असोसिएशन ऑफ इंडिया (AAI) आणि वर्ल्ड आर्चरी (WA) यांच्या आंतरराष्ट्रीय नियमांचे काटेकोर पालन करत ही स्पर्धा 'इंडियन (ट्रॅडिशनल), रिकर्व्ह आणि कंपाउंड' अशा तीन मुख्य प्रकारांत खेळवली गेली. यामध्ये १० वर्षांखालील, १७ वर्षांखालील आणि २१ वर्षांवरील अशा विविध वयोगटांतील मुला-मुलींनी आपले धनुर्विद्या कौशल्य पणाला लावले होते. दिवसभर चाललेल्या या चुरशीच्या सामन्यांमध्ये खेळाडूंनी अचूक वेध घेत उपस्थितांची मने जिंकली.
स्पर्धेच्या जाहीर झालेल्या निकालानुसार, १० वर्षांखालील इंडियन राउंड प्रकारात मुलांमध्ये अवनीश अलीगावे याने प्रथम, तर शोन साळोखे याने द्वितीय क्रमांक पटकावला. याच वयोगटात मुलींमध्ये जिया कलयागर प्रथम तर विना सूनगर द्वितीय स्थानाची मानकरी ठरली. १७ वर्षांखालील इंडियन राउंडमध्ये मुलांच्या गटात देवेंद्र पाटील याने बाजी मारली, तर वरद निमकर आणि साईराज गावडे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. मुलींच्या गटात संचित जाधव प्रथम तर देवरागणी सुतार द्वितीय आली. २१ वर्षांवरील इंडियन राउंडमध्ये मुलांमध्ये सचिन आडुळकर याने प्रथम आणि यश पाटील याने द्वितीय क्रमांक मिळवला, तर मुलींच्या गटात प्राजक्ता सूर्यवंशी हिने सुवर्ण यश संपादन केले.
दुसऱ्या बाजूला, रिकर्व्ह राउंडमध्ये १७ वर्षांखालील मुलांच्या गटात प्रणव पांघरे याने प्रथम, आदित्य पाटील याने द्वितीय आणि साईश शिर्के याने तृतीय क्रमांक मिळवला. मुलींच्या गटात स्वर देसाई हिने प्रथम, तर पूर्व दानोले हिने द्वितीय स्थान पटकावले. २१ वर्षांवरील रिकर्व्ह राउंडमध्ये मुलांच्या गटात शौर्य भोसले याने तर २1 वर्षांवरील कंपाऊंड राउंडमध्ये मुलींच्या गटात गायत्री पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले.
या दिमाखदार क्रीडा महोत्सवाच्या बक्षीस वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. स्नेहल कुमार बावडेकर, शिवसेना कोल्हापूर जिल्हा उपप्रमुख अवधूत साळोखे, संजय पाटील, असोसिएशनचे विवेक परीट व जीवन ऐणापुरे उपस्थित होते. या सर्व मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने शाल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन विशाल पाटील यांनी केले.
चालुक्याज स्पोर्ट्स अकॅडेमीचे संस्थापक शिवाजी साळुंखे , संचालक धैर्यशील पुंगावकर , संचालिका श्रुती पुंगावकर आणि कोल्हापूर शाखा प्रमुख संतोष बाबर यांच्या खंबीर नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा अत्यंत शिस्तबद्ध, सुरक्षित आणि यशस्वी रितीने संपन्न झाली.