'गोकुळ' निवडणूक रणधुमाळीला सुरुवात; मतदार यादी निश्चितीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर
schedule25 May 26 person by visibility 209 categoryउद्योग
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक वाहिनी आणि अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (गोकुळ) या 'अ' वर्गातील संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीची (सन २०२६ ते २०३१) बिगुल अखेर वाजले आहे. संघाच्या संचालक मंडळ सदस्यांच्या निवडणुकीकरिता सभासद संस्थांची मतदार यादी निश्चित करण्याचा कालबद्ध प्रशासकीय कार्यक्रम आज अधिकृतपणे मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश पुणे विभागाचे जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक (दुग्ध) राजकुमार पाटील यांनी आज, सोमवार दिनांक २५ मे रोजी जारी केले असून, यामुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात 'गोकुळ'च्या निवडणुकीची रणधुमाळी अधिकृतपणे सुरू झाली आहे.
या जाहीर झालेल्या सुधारित कालबद्ध प्रशासकीय कार्यक्रमानुसार (परिशिष्ट-'अ'), कोल्हापूर जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक (दुग्ध) यांच्याकडून संघाच्या संलग्न सदस्य प्राथमिक सहकारी दूध संस्थांना मतदार यादीत समाविष्ट करण्याकरिता पत्र पाठवले जाणार आहे. हा पहिला टप्पा मंगळवार दिनांक २६ मे ते सोमवार दिनांक १ जून २०२६ या कालावधीत पूर्ण केला जाईल. यानंतरचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे, गोकुळशी संलग्न असलेल्या प्राथमिक सहकारी दूध संस्थांनी त्यांच्या संस्थेच्या वतीने अधिकृत प्रतिनिधी नियुक्त करण्याबाबतचा ठराव प्राधिकृत अधिकारी तथा तालुका सहकारी निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर करायचा आहे. हा ठराव सादर करण्यासाठी मंगळवार दिनांक २ जून २०२६ ते बुधवार दिनांक १ जुलै २०२६ पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम २०१४ मधील कायदेशीर तरतुदीनुसार ही सर्व पुढील कार्यवाही पार पाडली जाणार आहे. गोकुळ दूध संघाची ही प्रारूप मतदार यादी तयार करण्यासाठी व निश्चित करण्यासाठी दोन्ही स्तरावर कसून तयारी सुरू झाली आहे. या निवडणुकीच्या संपूर्ण कालावधीत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक (दुग्ध) पुणे विभाग यांचे कार्यालय, कोल्हापूर येथील ताराबाई पार्क मधील 'जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी' यांच्या कार्यालयातच कार्यरत राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 'गोकुळ'वर वर्चस्व राखण्यासाठी आतापासूनच जिल्ह्यातील सत्ताधारी आणि विरोधक सक्रिय झाले असून, मतदार यादीच्या ठराव गोळा करण्याच्या प्रक्रियेपासूनच जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.