गोकुळच्या शासन नियुक्त संचालकांविरोधात महायुतीच्या कार्यकर्त्यांचेच बंड; बानगेत महायुती सरकारच्या पुतळ्याचे दहन!
schedule05 Nov 26 person by visibility 75 categoryराजकीय
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या राजकारणात आता नवा वाद निर्माण झाला आहे. शासनाने गोकुळवर नियुक्त केलेल्या संचालकांची निवड प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप करत कागल तालुक्यातील बानगे येथे संतप्त दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केले. विशेष म्हणजे, महायुतीतील नेत्यांच्या निर्णयाविरोधात महायुतीच्याच कार्यकर्त्यांनी महायुती सरकारच्या पुतळ्याचे दहन करत निषेध व्यक्त केला. नियुक्ती रद्द न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
गोकुळ दूध संघ हा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टातून उभा राहिलेला सहकारी संघ आहे. मात्र, या संघावर शासन नियुक्त संचालकांची निवड करताना नियमबाह्य प्रक्रिया राबवण्यात आल्याचा आरोप आता खुद्द महायुतीच्या कार्यकर्त्यांकडूनच केला जात आहे. कागल तालुक्यातील बानगे येथे याच निर्णया विरोधात संतप्त दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले.
शासनाने केलेल्या या नियुक्त्या शेतकऱ्यांच्या हिताला डावलणाऱ्या असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली. संबंधित कार्यकर्त्यांनी महायुती सरकारच्या निर्णयाविरोधातच आक्रमक भूमिका घेत पुतळा दहन केले.
गोकुळ हा शेतकऱ्यांच्या घामाचा आणि कष्टाचा संघ असून, त्याच्या कारभारात शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना डावलून निर्णय घेणे मान्य नसल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. शासन नियुक्त संचालकांची निवड रद्द करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
◼️बानगे येथील या आंदोलनामुळे गोकुळच्या सत्तासंघर्षाला आता वेगळे वळण मिळाले आहे. विशेष म्हणजे, महायुतीतीलच कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांच्या निर्णयाविरोधात भूमिका घेतल्याने कागल तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.