झोपडपट्टीतील नागरिकांचे निवासी अतिक्रमण नियमित करून घेण्यासाठी पाठपुरावा करणार, खासदार धनंजय महाडिक यांची झोपडपट्टीधारकांना ग्वाही
schedule04 Nov 26 person by visibility 161 categoryमहानगरपालिका
◼️शासकीय जमीनीवरील निवासी अतिक्रमणं नियमितीकरण करण्यासाठी विचारेमाळ झोपडपट्टीत झाले शिबिर
कोल्हापूर : २०११ पूर्वीची शासकीय जमीनीवरील निवासी अतिक्रमणं नियमितीकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे झोपडपट्टीतील नागरिकांना आपली घरे मालकीची होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विचारेमाळ, सदर बाजार परिसरातील झोपडपट्टीधारकांनी आवश्यक कागदपत्रे जमा करावीत, सर्व पात्र अर्जदारांची निवासी अतिक्रमण नियमित करून घेण्यासाठी आपण पाठपुरावा करू, असे आश्वासन खासदार धनंजय महाडिक यांनी दिले.
विचारेमाळ झोपडपट्टी आणि भोसले वसाहतीमध्ये झालेल्या प्रॉपर्टी कार्ड नोंदणी शिबिरात ते बोलत होते.
शासकीय जमीनीवरील निवासी अतिक्रमणे नियमितीकरण योजना शासनाने जाहीर केली आहे. अतिक्रमणांना नियमित करण्याची प्रक्रिया कोल्हापूर महापालिकेमार्फत सुरू करण्यात आलीय. झोपडपट्टीतील नागरिकांना या योजनेची माहिती मिळावी आणि जास्तीत जास्त नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, यासाठी विचारेमाळमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉलमध्ये ८ नोव्हेंबरपर्यंत प्रॉपर्टी कार्ड शिबिर सुरू करण्यात आले आहे. या शिबिराला खासदार धनंजय महाडिक, महापौर रूपाराणी निकम, माजी नगरसेवक संजय निकम, दिलीप पोवार, शुभांगी भोसले, स्मिता माने, रमेश भोसले, अनिल माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
शासनाच्या विविध योजनांची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. कॉंग्रेसने केवळ आश्वासने दिली. पण झोपडपट्टीधारकांना स्वतःच्या मालकीची घरे मिळाली नाहीत. पण महायुती सरकारने नागरिकांच्या हिताचा विचार करून शासकीय जमीनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व झोपडपट्टी धारकांनी कागदपत्रांची पुर्तता करावी, त्यांची घरे स्वमालकीची करून घेण्यासाठी शासनस्तरावर आपण पाठपुरावा करू, अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली. या योजनेत एकही लाभार्थी वंचित राहता कामा नये, यासाठी हे शिबिर आयोजित केले आहे, असे महापौर रूपाराणी निकम आणि संजय निकम यांनी सांगितले. लाभार्थ्यांनी घरफाळा पावती, असेसमेंट उतारा, झोपडपट्टी कार्ड, पाणीबिल, लाईट बिल, स्वयंघोषणा पत्र, मतदार यादीची नोंद किंवा मतदान कार्ड ही कागदपत्रे जोडून विहित नमुन्यातील अर्ज भरून द्यावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी सागर पोवार, राजाराम धनवडे, बापूसाहेब कांबळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.