शिवसृष्टीमुळे पर्यटकांना इतिहासाची ओळख होण्यासह बारामतीचे सांस्कृतिक व पर्यटन महत्त्व अधिक वाढेल : उपमुख्यमंत्री अजित पवार
schedule27 Aug 25 person by visibility 197 categoryराज्य

बारामती : कन्हेरी परिसरात शिवसृष्टीमुळे पर्यटकांना इतिहासाची ओळख आणि त्यातून प्रेरणा मिळेल. तसेच बारामतीचे सांस्कृतिक व पर्यटन महत्त्व अधिक वाढेल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री पवार यांनी आज बारामती परिसरातील विविध विकास कामांची पाहणी केली. शिवसृष्टी, कन्हेरी वन उद्यान परिसर, तांदुळवाडी येथील वृद्धाश्रम तसेच तिरंगा चौकाची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी खासदार सुनेत्रा पवार उपस्थित होत्या.
पवार यांनी शिवसृष्टी या ऐतिहासिक थीम पार्क परिसरातील कॅनॉल शेजारील रस्त्याची पाहणी केली व सुधारित कामासाठी सूचना दिल्या. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन प्रवासाचे दर्शन घडवणाऱ्या अनेक भव्य प्रतिकृती उभारण्यात येणार आहेत. यामध्ये शिवकाळातील सदरा व आग्रा दरबार, शिवकालीन बाजारपेठा व राजसभा, राजगड प्रवेशद्वाराची प्रतिकृती, शिवकालीन आरमार आणि माहितीपट व थ्रीडी ॲनिमेशनद्वारे शिवकालीन युद्धाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.
पवार यांनी बारामतीच्या वनपरिक्षेत्र अंतर्गत उभारण्यात आलेल्या कन्हेरी वन उद्यान परिसरातील विकास कामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाच्या संदर्भातील माहिती जाणून घेतली. यावेळी ‘ॲडव्हेंचर अँड नेचर क्लब’मार्फत साहसी खेळांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप झाला. याप्रसंगी १४ प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. अशा उपक्रमांच्या माध्यमातून युवा वर्गाला रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील आणि बारामतीच्या पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.