राज्य सरकारने कोल्हापुरकरांच्या पाठीत खंजीर खुपसला : आमदार सतेज पाटील; रेखांकन बदलून कोल्हापुरातून शक्तीपीठ महामार्ग
schedule28 Aug 25 person by visibility 280 categoryराज्य

कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्गाला विरोध झाल्यानंतर राज्य सरकारने निवडणुकीत कोल्हापुरपुरती अधिसूचना रद्द केली, त्याचा उत्सव साजरा केला. आता मात्र, रेखांकन बदलून कोल्हापुरातून महामार्ग करणार हे अधिसूचनेत स्पष्ट केले आहे. त्यामुळे सरकारने कोल्हापुरकरांची घोर फसवणूक करुन पाठीत खंजीर खुपसला असल्याची जळजळीत प्रतिक्रिया काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली. याविरोधातील लढा तीव्र करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
ते म्हणाले, शक्तीपीठ महामार्गाबद्दलचा अध्यादेश शासनाने आज जारी केला आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यतील रेखांकनाबद्दलही उल्लेख आहे. महायुतीच्या नेत्यांनी, आमदारांनी निवडणुकीच्या आधी आम्ही हा महामार्ग रद्द करणार असा शब्द दिला होता. त्यांनीही शब्द फिरवल्याचे आजच्या अध्यादेशाद्वारे सिद्ध झाले आहे. मुद्दा क्रमांक तीनमध्ये ऑक्टोबरची अधिसूचना रद्द करत असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. जी अधिसूचना मार्चमध्ये होती ती ऑक्टोबरमध्ये रद्द केली होती. कोल्हापुरापुरता महामार्ग रद्द केला होता ती अधिसूचना या अध्यादेशाद्वारे रद्द केली आहे. म्हणजे कोल्हापुरातून महामार्ग होणार हे या अध्यादेशाद्वारे स्पष्ट झाले आहे. कोल्हापुरकरांची तर फसवणूक झालीच आहे पण शेतकऱ्यांच्या पाठीतही सरकारने खंजीर खुपसला आहे.
बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा गरज नसेलेला महामार्ग नको आहे. शासन आधीच आर्थिक अडचणीत आहे. लाखो कोटी रुपयांची बिले दिलेली नाहीत अशी वास्तवता समोर येत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार होईल की नाही अशी साशंकता आहे. त्यामुळे आम्ही शांत बसणार नाही, शक्तीपीठ महामार्गा विरोधात तीव्र आंदोलन करु, हा पैसा खर्च करायचा असेल तर नागपूर -रत्नागिरी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांना पाच हजार कोटी रुपये द्या अन रस्ते करा अशी मागणीही पाटील यांनी केली. मुंबईत लोकल ट्रेनमधून पडून रोज पाच जणांचा मृत्यू होतोय. ते मृत्यू थांबवण्यासाठी पैसे द्या, मध्यमवर्गीयांना महागाईतून दिलासा द्या, सरकारी नोकरभरती करा. एमपीएसीच्या मुलांना दिलासा द्या. परंतू गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग करु नका. याविरोधात आता आमचा लढा अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा सतेज पाटील यांनी दिला.