गणेश चतुर्थी निमित्त वारणा दूध संघ सभासदांना देणार तूप
schedule19 Aug 25 person by visibility 229 categoryउद्योग

वारणानगर : वारणा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत गणेश चतुर्थीनिमित्त सभासदांना तूप भेट देण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली. दि. २० ते ३१ ऑगस्ट कालावधीत संबंधित प्राथमिक दूध संस्था, संघाची वितरण केंद्र व वितरक यांच्यामार्फत सभासदांना तूप वाटप होणार आहे.
वारणा दूध संघाच्या ज्या 'अ' वर्ग सभासदांनी शेअर पूर्ण केले आहेत व जे उत्पादक दुधाचा गावातील दूध संस्थामार्फत संघास पुरवठा करतात अशा 'अ' वर्ग सभासद, 'ब' वर्ग संस्था सभासद आणि राज्यभरातील 'क' वर्ग ग्राहक सभासदांना संघामार्फत दरवर्षी महाशिवरात्री, गणेशचतुर्थी व दीपावलीला सवलतीच्या दरात तूप भेट दिली जाते.
वारणा दूध संघाच्या कार्यक्षेत्रातील दूध संस्थांकडे सभासदांना दि.२१ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत तूप वितरित केले जाणार आहे. कोल्हापूर व परिसरातील 'अ' वर्ग व 'क' वर्ग सभासदांचे तुपाचे स्टेशन रोड कोल्हापूर येथील विक्री केंद्रातून वाटप होणार आहे. सभासदांनी सवलतीच्या दरातील तूप घेऊन जावे असे आवाहन संघाचे कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांनी केले.
यावेळी संघाचे उपाध्यक्ष एच.आर. जाधव, फॅक्टरी मॅनेजर श्रीधर बुधाळे, मार्केटिंग मॅनेजर अनिल हेर्ले, संकलन व्यवस्थापक अशोक पाटील, असि. मॅनेजर अकौंटस प्रवीण शेलार, मार्केटिंग असि. मॅनेजर आर.व्ही.देसाई, प्रितीन बासष्टवार आदी उपस्थित होते.