इशारा पातळी गाठताच नागरीकांना स्थलांतरीत करा : प्रशासक के.मंजूलक्ष्मी
schedule19 Aug 25 person by visibility 271 categoryमहानगरपालिका

▪️संभाव्य पूरस्थितीमुळे महापालिकेची निवारा केंद्रे सज्ज
कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत असून ती इशारा पातळीकडे जात आहे. संभाव्य पूरस्थितीचा विचार करता महानगरपालिकेने सर्व निवारा केंद्रे सज्ज ठेवली आहेत. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी अधिकाऱ्यांना पूरबाधित भागांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या असून, इशारा पातळी गाठताच ज्या भागात पाणी शिरते तेथील नागरिकांना तात्काळ स्थलांतरित करण्याचे आदेश दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी आज सकाळी दसरा चौक येथील चित्रदुर्ग मठ व दिगंबर जैन बोर्डिंग निवारा केंद्राची पाहणी केली. या केंद्रांची संपूर्ण साफसफाई करून ती नागरिकांसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत. या पाहणीवेळी सहायक आयुक्त संजय सरनाईक, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, युवराज जबडे, आरोग्य निरीक्षक सुशांत कांबळे उपस्थित होते.
आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत पूरग्रस्त भागातील नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अग्निशमन विभागामार्फत बोटी व आवश्यक अनुषंगिक साहित्यही सज्ज ठेवण्यात आले आहे. तसेच शिवाजी पूल ते गंगावेश या रस्त्याकडेला नदीचे पाणी आल्याने सदरचा रस्ता बॅरेकेट लावून वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे.