कोल्हापुरातील सिद्धार्थनगरात दोन गटांत राडा, वाहनांची तोडफोड; दगडफेक अन् जाळपोळ; राखीव दल तैनात
schedule23 Aug 25 person by visibility 333 categoryगुन्हे

कोल्हापूर : सिद्धार्थनगर परिसरातील उद्यानासमोर मंडळाचा फलक लावण्यावरून तसेच साऊंड, लाईट्सचे स्ट्रक्चर उभे करण्यावरून निर्माण झालेल्या वादाचे पर्यावसन शुक्रवारी रात्री प्रचंड दगडफेकीत आणि वाहनांची तोडफोड करण्यात झाले. दोन गटांतील या धुमश्चक्रीत काहीजण जखमी झाले तर पाच ते सहा वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुमारे तासभर दोन्ही बाजूने राडा करण्यात आला. यामध्ये महिलासह लहान मुले, तरुण यांचा सहभाग होता. पोलिसांनी प्रचंड बंदोबस्तात ही परिस्थिती नियंत्रणात आणली .
सिद्धार्थनगराच्या कोपऱ्यावर भारत तरुण मंडळ प्रणित राजेबागस्वार फुटबॉल क्लबचा फलक लावण्यात आला होता. या क्लबचा वर्षापन दिन असल्याने शुक्रवारी रात्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे सिद्धार्थनगर कमानीच्या पुढेच साऊंड तसेच लाईटसाठी स्ट्रक्चर उभे केले गेले होते. परंतु एका गटाने त्यास हरकत घेतली. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यास जाऊन तक्रार केली. त्यांना परवानगी दिली आहे का, अशी विचारणाही करण्यात आली. त्यानंतर पोलिस निरीक्षक श्रीराम कणेरकर यांनी घटनास्थळी जाऊन त्यांनी हे स्ट्रक्चर सक्तीने उतरविण्यास भाग पाडले.
त्यामुळे या वादावर पडदा पडला असाच समज झाला. परंतु स्ट्रक्चर उतरविल्यामुळे दुसरा गट संतप्त झाला होता. रात्री साडेआठ वाजता दुसऱ्या गटाचे लोक त्याठिकाणी जमण्यास सुरुवात झाली. काही जण इतके संतप्त झाले होते की, त्यांनी तक्रार करणाऱ्यांच्या दिशेने दगडफेक केली. त्यामुळे तक्रार करणारा गटही आक्रमक झाला. त्यांच्या बाजूनेही दगडफेक सुरू झाली.
सिद्धार्थ नगर परिसर व राजेबागस्वार परिसरातील दोन गटांमधील दगडफेकीसह जोरदार राडा इतका टोकाला गेला की, एका गटाने दगडफेकीसह सिद्धार्थनगराकडील वाहनांची तोडफोड व जाळपोळ करण्यास सुरुवात केली. लावण्यात आलेला फलक फाडण्यात आला.
राड्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. त्यांनी हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. परंतु दोन्ही गट आक्रमक झाल्याने पोलिसांना ऐकत नव्हते. पोलिसांची कुमक वाढल्यानंतर दोन्ही गटांना शांत करण्यात पोलिस अधिकाऱ्यांनी यश मिळविले. परिसरात वातावरण शांत असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी सांगितले की, दोन्ही गटांतील प्रमुखांची बैठक झाली असून, गैरसमज दूर करण्यात आहेत. याबाबत कोणीही अफवा पसरवू नयेत, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल.