चित्रदुर्ग मठातील स्थलांतरित केंद्राची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी
schedule21 Aug 25 person by visibility 265 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी धोका पातळीवर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने तातडीने सुतारवाडा येथील 51 नागरिकांचे चित्रदुर्ग मठातील निवारा केंद्रात स्थलांतर केले.
या केंद्राला आज सकाळी प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी भेट देऊन निवाऱ्यातील सोयीसुविधांची पाहणी केली. नागरिकांना जेवण, नाश्ता, आरोग्य सेवा तसेच इतर सुविधा व्यवस्थित मिळत आहेत का याची त्यांनी माहिती घेतली. यावेळी महिलांनी महापालिकेची व्यवस्था समाधानकारक असल्याचे सांगितले. या पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळ, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, उपशहर अभियंता अरुण गुर्जर, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे आणि सहा. अधीक्षक मकरंद जोशी उपस्थित होते.
या निवारा केंद्रामध्ये बुधवारी रात्री 11 वाजता सुतारवाडा येथील 12 कुटुंबे स्थलांतरी करण्यात आली. यामध्ये 18 पुरुष, 15 महिला, 12 लहान मुले व 6 मुली अशी एकूणन 51 नागरीकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. महापालिकेकडून स्थलांतरित नागरिकांना सकाळी चहा-नाश्ता, दुपारी व रात्री जेवण तसेच सायंकाळी चहाची व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यक त्या सर्व सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन महापालिकेच्या सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत. चारही विभागीय कार्यालयातील निवारा केंद्रे सज्ज आहेत. आपत्ती व्यवस्थापन पथके रात्रभर पूरग्रस्त भागात फिरून नागरिकांना स्थलांतराची सूचना देत आहेत.
▪️नालेसफाईमुळे नागरी वस्तीत पाणी शिरले नाही
शहरामध्ये महानगरपालिकेच्यावतीने सहा.आयुक्त कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पावसाळयापुर्वी नाले सफाईतून 45 हजार 500 टन गाळ काढण्यात आला. त्यामुळे यावर्षी शहरातील नाल्याचे पाणी वस्त्यांमध्ये कुठेही शिरले नाही. दरवर्षी रिलायंन्स मॉलच्या पाठीमागे राजाराम बंधा-याची 43 फुट पाणी पातळी गाठल्यावर पाणी या परिसराच्या कुंभार गल्ली व आजूबाजूच्या वस्तीमध्ये शिरते. परंतु यावर्षी महापालिकेने खोलवर व नियोजनबद्ध नालेसफाई केल्याने 43 फुटावरही पाणी वाढूनही ते बाहेर न पडता वाहत राहिले आहे.