कोल्हापूर जिल्हा रिक्षा बंदचा एल्गार! सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा; मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
schedule20 Nov 26 person by visibility 125 categoryराज्य
कोल्हापूर : रिक्षा व्यवसायातील विविध प्रलंबित मागण्या आणि शासनाच्या धोरणाविरोधात कोल्हापूर जिल्हा सर्व रिक्षा संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. येत्या रविवार, २२ नोव्हेंबर रोजी रात्री ११.५५ वाजल्यापासून ते सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करून निवेदन सादर करण्यात येणार आहे.
दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, रिक्षा चालकांच्या अडीअडचणींवर चर्चा करण्यासाठी दि. १५ नोव्हेंबर रोजी आळंदी देवाची (जि. पुणे) येथे राज्यातील सर्व रिक्षा संघटनांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत शासनाच्या धोरणाविरोधात टप्प्याटप्प्याने तीव्र आंदोलन छेडण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
◼️संघटनांच्या प्रमुख मागण्या:
* बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या बाईक टॅक्सी ॲपवर कायमस्वरूपी बंदी घालावी.
* ए.टी.एस. (ATS) मशिनद्वारे केल्या जाणाऱ्या पासिंगमधून रिक्षाला सूट द्यावी.
* ई-रिक्षांना परमिट बंधनकारक करावे.
शासनाने या मागण्या मान्य करून आपल्या धोरणात बदल न केल्यास आगामी काळात टप्प्याटप्प्याने अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे.
या आंदोलनाची माहिती चंद्रकांत भोसले, राजेंद्र जाधव, अविनाश दिंडे, राहुल पोवार, ईश्वर चव्हाण, जाफर मुजावर, राजू जाधव, रमेश पोवार, अनुप पोवार, रामू जमादार, अरुण घोरपडे, राजेंद्र थोरोडे, राकेश गायकवाड, सुभाष शेटे, नरेंद्र पाटील, तानाजी भोसले, महेश मरके आणि आनंदराव जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.