अपघातात मृत सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी हिमालयासारखा उभा राहणार : मंत्री हसन मुश्रीफ यांचा दिलासा
schedule20 Nov 26 person by visibility 238 categoryसामाजिक
◼️पूर्वनियोजित दौरा रद्द करून घटनास्थळी भेट; कारखाना व्यवस्थापन, कामगार संघटना व विमा कंपनीमार्फत आर्थिक मदतीचे आश्वासन.....
कोल्हापूर : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा धामणे–पिंपळगाव मार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीखाली सापडून दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात कर्मचाऱ्यांचे निधन झाल्याची हृदयद्रावक बातमी समजताच वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी आपला पूर्वनियोजित दौरा रद्द करून तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची सविस्तर माहिती घेत त्यांनी मृत कर्मचाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
या दुःखद प्रसंगी मंत्री मुश्रीफ यांनी मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी कारखाना व्यवस्थापन, कामगार संघटना आणि विमा कंपनीच्या माध्यमातून तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी महादेव दिनकर करवळ, वय ५० रा सोनारवाडी यांच्या कुटुंबीयांना कारखाना व्यवस्थापन व कामगार संघटनेच्यावतीने पाच लाख रुपये, तसेच भविष्य निर्वाह निधी (पीएफ) मार्फत पाच लाख रुपये अशी एकूण दहा लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तर बचाराम शिवाजी सुतार, वय- ६५ रा. मिणचे खुर्द यांच्या कुटुंबीयांना कारखाना व्यवस्थापनाकडून पाच लाख रुपये देण्यात येणार असून, विमा कंपनीमार्फतही नियमानुसार जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. केवळ कायदेशीर तरतुदींनुसार मिळणाऱ्या मदतीपुरतेच आपण थांबणार नसून, संबंधित कुटुंबीयांना इतर माध्यमांतूनही आर्थिक आधार मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
मृत कर्मचाऱ्यांचे बँकेमध्ये खाते असल्यास संबंधित बँकेच्या माध्यमातूनही काही मदत मिळू शकते का, याची तपासणी करून त्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले की, "या अपघातामुळे दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे निधन होणे ही कधीही भरून न निघणारी हानी आहे. या दुःखाची जाणीव आम्हाला आहे. अशा कठीण प्रसंगी या कुटुंबीयांना एकटे पडू देणार नाही. आर्थिक मदतीसह प्रत्येक आवश्यक बाबतीत मी त्यांच्या पाठीशी हिमालयासारखा खंबीरपणे उभा राहीन."