ईद फेस्टिवलतर्फे आयोजित ‘दीनीयात ज्ञानस्पर्धा’ आता २८ नोव्हेंबरला!
schedule20 Nov 26 person by visibility 137 categoryसामाजिक
◼️पालकांच्या मागणीनुसार स्पर्धेच्या तारखेत बदल; दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी, पाच केंद्रांवर होणार परीक्षा
कोल्हापूर : ईद फेस्टिवल, कोल्हापूरतर्फे मा. हाजी बाळासाहेब आत्तार, मा. हाजी अब्दुल गफूर वंटमुरे आणि मा. हाजी डॉ. आदम आत्तार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ‘दीनीयात ज्ञानस्पर्धा’ आता शनिवार, दि. २१ नोव्हेंबरऐवजी शनिवार, दि. २८ नोव्हेंबर २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. पालकांच्या मागणीनुसार तसेच स्पर्धेला मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन आयोजकांनी स्पर्धेच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेसाठी आतापर्यंत दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
विद्यार्थ्यांना प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचे जीवनचरित्र, सदाचार, बंधुभाव, मानवता आणि नैतिक मूल्यांची ओळख करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यमांतील इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धा पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी ते बारावी अशा तीन गटांत होणार असून, हिंदी भाषेतील ‘दीनीयात’ पुस्तकावर आधारित १०० बहुपर्यायी प्रश्नांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या तयारीसाठी १०० रुपये किमतीचे ‘दीनीयात’ पुस्तक विशेष सवलतीच्या दरात अवघ्या २० रुपयांत उपलब्ध करून देण्यात आले आहे. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे व सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.
◼️पाच ठिकाणी परीक्षा केंद्रांची व्यवस्था
स्पर्धेसाठी मुस्लिम बोर्डिंग, दसरा चौक, कोल्हापूर; मौलाना अबुल कलाम आझाद हायस्कूल, सरनाईक वसाहत, कोल्हापूर; नॅशनल हायस्कूल, इचलकरंजी; उर्दू विद्यामंदिर, रुकडी आणि अँग्लो उर्दू हायस्कूल, शिरोली पुलाची अशी पाच परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
◼️नोंदणीकृत विद्यार्थी व पालकांनी स्पर्धेच्या बदललेल्या तारखेची नोंद घेऊन शनिवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी आपापल्या परीक्षा केंद्रांवर नियोजित वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन ईद फेस्टिवलचे अध्यक्ष गणी आजरेकर यांनी केले आहे.
स्पर्धेसंबंधी अधिक माहितीसाठी ९५९५००८५९१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे.