कोरे अभियांत्रिकीत ‘इल्लूमिनेट २०२६’ उद्योजकता कार्यशाळेचे यशस्वी आयोजन
schedule14 Oct 26 person by visibility 271 categoryशैक्षणिक
वारणानगर : विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय दृष्टिकोन विकसित करणे, नवकल्पनांना व्यावसायिक दिशा देणे आणि स्टार्टअप संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ संचलित वारणा विद्यापीठाच्या तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (स्वायत्त), वारणानगर येथे ‘इल्लूमिनेट २०२६’ या एकदिवसीय उद्योजकता कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
यावेळी डॉ. हसन एम. पी. यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, उद्योजक होण्यासाठी केवळ नाविन्यपूर्ण कल्पना असून चालत नाही, तर त्या कल्पनेचे प्रत्यक्ष व्यवसायात रूपांतर करण्यासाठी योग्य नियोजन, बाजारपेठेची समज, आर्थिक शिस्त आणि जोखीम स्वीकारण्याची तयारी आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी समस्यांकडे संधी म्हणून पाहावे, स्वतःच्या कल्पनांवर विश्वास ठेवावा आणि छोट्या प्रयत्नांतून स्टार्टअपची सुरुवात करावी. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना उद्योजकतेच्या प्रत्यक्ष जगाची ओळख होऊन रोजगार शोधणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनण्याची प्रेरणा मिळते, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून करण्यात आली. त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना व्यवसाय नियोजन, स्टार्टअप उभारणी, उद्योजकतेच्या संधी आणि नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यावसायिक स्वरूप देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
‘इल्लूमिनेट २०२६’ हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या कल्पनांना दिशा देणारा आणि नवकल्पनांना उद्योजकतेशी जोडणारा महत्त्वपूर्ण मंच ठरला. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि उद्योजकीय दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमासाठी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी एन. एच. पाटील, कुलगुरू डॉ. टी. शिर्के आणि श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कारजिन्नी यांचे प्रोत्साहन लाभले.
यावेळी संस्थेचे प्राचार्य डॉ. के. आय. पाटील, अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे, आयईडीसी समन्वयक प्रा. ए. आर. चौगुले आणि प्रणव भगत उपस्थित होते.