कोल्हापूर महानगरपालिकेत गुंठेवारी नियमितीकरणासाठी १६ ऑक्टोबरला विशेष शिबिर
schedule14 Oct 26 person by visibility 270 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : महानगरपालिका क्षेत्रातील गुंठेवारी नियमितीकरणाची प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी महानगरपालिकेच्या नगररचना विभागामार्फत शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी एक दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या सूचनेनुसार हे शिबिर सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील नगररचना विभागाकडे गुंठेवारी नियमितीकरणासाठी दाखल झालेल्या प्रकरणांवर कार्यवाही करण्याच्या उद्देशाने हे शिबिर घेण्यात येत आहे. हे शिबिर राजारामपुरी, बागल मार्केट, दुसरा मजला नगररचना विभागात होणार आहे.
या शिबिरात संबंधित अर्जदार, मिळकतधारक, आर्किटेक्ट व इंजिनिअर यांनी गुंठेवारी नियमितीकरणाच्या कामासाठी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे. या शिबिरामुळे नियमितीकरणासाठी दाखल झालेल्या प्रकरणांबाबत आवश्यक कार्यवाही करण्यास मदत होणार आहे.
तरी या एकदिवसीय शिबीराचा जास्तीत जास्त मिळकतधारक, आर्किटेक्ट व इंजिनिअर यांनी लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्या नगररचना विभागामार्फत करण्यात आले आहे.