१३ केंद्रांवर शिरोळ तालुका प्रज्ञाशोध परीक्षा संपन्न ; ७ हजार ३१ विद्यार्थ्यांचा सहभाग
schedule10 Apr 26 person by visibility 170 categoryसामाजिक
🔸आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फौंडेशनचे सलग चौथ्या वर्षी आयोजन
शिरोळ : शिरोळ तालुक्याच्या सर्वांगिण विकासात आरोग्य व शिक्षण विभाग महत्वाचे आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील भौतिक व पायाभूत इत्यादी सर्व प्रकारच्या आमूलाग्र बदलासाठी आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर प्रयत्नशील आहेत. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी बालपणीच बाळकडू मिळावेत, या उद्देश्याने शिरोळ तालुक्यातील इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी गेली तीन वर्षे स्पर्धा परीक्षेचे आयोजन डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फौंडेशन करीत आहे.
यंदाचे हे चौथे वर्ष असून आज शुक्रवारी तालुक्यातील १३ केंद्रांवर सकाळी ९ ते १० या वेळेत संपन्न झाली, या परीक्षेत ७ हजार ३१ विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला होता.
जयसिंगपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा या उपक्रमामध्ये सिंहाचा वाटा आहे. पंचायत समिती शिरोळ शिक्षण विभाग गट विविध उपक्रमांचे आयोजन करीत असतो. या परीक्षेमुळे शिष्यवृत्ती परीक्षा,जवाहर नवोदय निवड परीक्षा, मिशन अंकुर परीक्षा यांसह भविष्यातील अनेक स्पर्धा परीक्षांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी उपयोग होत आहे.
जिल्हा परिषद शाळा,जयसिंगपूर नगरपालिका या शाळामधील मराठी व उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी शिरोळ तालुका प्रज्ञाशोध परीक्षा झाली.
परीक्षा केंद्रांवर भेट देवून शुभेच्छा देण्यासाठी आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर उदगाव येथील परीक्षा केंद्राला भेट दिली. त्यांच्यासमवेत जि.प.सदस्य अमोल चव्हाण, पं.स.सदस्या सौ.दिप्ती जाधव, गटशिक्षणाधिकारी भारती कोळी, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे, माळी, केंद्र प्रमुख यशवंत पेठे होते. कन्या व कुमार विद्या मंदिर घोसरवाड परीक्षा केंद्राला जि.प. कोल्हापूर समाजकल्याण सभापती श्रध्दाताई गायकवाड, पं.स.शिरोळ चे सदस्य बाबासाहेब वनकोरे, घोसरवाडचे विजीतसिंह शिंदे सरकार व अविनाश गायकवाड यांनी सदिच्छा भेट देवून शुभेच्छा दिल्या. शिरोळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद कुरणे व रणजीत कदम यांनी विद्या मंदिर शिवनाकवाडी येथे भेट दिली.
स्वरुपाताई पाटील यड्रावकर यांनी दानोळी केंद्राला भेट देवून शिक्षकांना मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान डॉ.आमदार राजेंद्र यड्रावकर यांच्या स्नुषा स्फूर्तीताई यड्रावकर यांनी केंद्रशाळा नांदणी येथे भेट देवून सदिच्छा दिल्या. केंद्रीय शाळा अकिवाट येथे पंचायत समिती सदस्य नाना उपाध्ये यांनी भेट दिली. कुरुंदवाड येथील कन्या वि.मं.नं.१ शाळेतील केंद्राला समाजकल्याण सभापती सौ.श्रद्धाताई गायकवाड यांनी सदिच्छा भेट देवून समाधान व्यक्त केले.
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या स्नुषा स्फूर्तीताई यड्रावकर, जि.प सदस्य अमोल चव्हाण, गटशिक्षणाधिकारी सौ. भारती कोळी,शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत यांनी दत्तनगर केंद्रात भेट दिली.
तालुका व जयसिंगपूर नगरपालिका येथील केंद्रांवर जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य,डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फौंडेशन चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भेट देवून परीक्षा कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.
गेली चार वर्षे सुरु असलेल्या आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फौंडेशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिरोळ तालुका प्रज्ञाशोध परीक्षा (STS)मुळे १ली, २ री वर्गातील विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षे संदर्भातील भीती दूर होवून आत्मविश्वासाने सामोरे जात असून शिष्यवृत्ती,नवोदय यासारख्या स्पर्धा परीक्षेत शिरोळ तालुक्याचा निकाल चांगला लागत आहे. या उपक्रमांबद्दल तालुक्यातील पालकांत समाधान व्यक्त होत आहे.
📕जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावणे हेच ध्येय
शिरोळ तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्पर्धा परीक्षांचे महत्त्व अधोरेखित करत प्रज्ञाशोध परीक्षेसारख्या उपक्रमांना प्राधान्य दिले जात आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासून स्पर्धात्मक वृत्ती निर्माण व्हावी, त्यांच्या मनातील परीक्षेची भीती दूर व्हावी आणि आत्मविश्वास वाढावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे आणि विशेषतः मुलींनी भविष्यातील स्पर्धा परीक्षांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी हे उपक्रम राबवले जात आहेत. प्रज्ञाशोध परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, नवोदय तसेच इतर स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी करण्यास मदत होत आहे. भविष्यात या स्पर्धेला आणखी व्यापक स्वरूप देऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचा मानस आहे.
— आमदार डॉ. राजेंद्र पाटील -यड्रावकर