डीकेटीईच्या १० विद्यार्थ्यांचे हॉफ विद्यापीठ जर्मनी येथे गुणवत्तापूर्ण कामगिरी
schedule10 Apr 26 person by visibility 124 categoryशैक्षणिक
इचलकरंजी : हॉफ युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्सेस, जर्मनी या विद्यापीठामध्ये डीकेटीई मधील १० टेक्स्टाईल आणि कॉम्प्युटर ब्रँचच्या विद्यार्थी क्रेडिट ट्रान्स्फर स्कीम अंतर्गत उत्कृष्ट प्रशिक्षण पूर्ण करीत आपली गुणवत्ता सिध्द करीत आहेत. डीकेटीई व हॉफ विद्यापीठ यांच्यातील शैक्षणिक करारामुळे गेल्या दहा वर्षांपासून विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होत आहे. या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण कालावधीत केलेल्या उल्लेखन्नीय कामगिरीमुळे जागतिक स्तरावर डीकेटीई व इचलकरंजीचे नाव उज्वल होत आहे.
डीकेटीईचे ३१ हून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी शैक्षणिक सामंजस्य करार असून, या अंतर्गत हॉफ युनिव्हर्सिटी, जर्मनी यांच्याशी शैक्षणिक करार झाला आहे. हॉफ युनिव्हर्सिटी हे जर्मनी येथील उच्च शिक्षणासाठी नामांकित विद्यापीठ आहे. टेक्स्टाईल व कॉम्प्युटर क्षेत्रात सातत्याने अधुनिकीकरण होत आहे, त्याचा अभ्यास सातत्याने होणे गरजेचे आहे.अशा करारामुळे संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता, जागतिक दृष्टीकोन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील भक्कम ओळख पुन्हा अधोरेखित झाली आहे.
शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे निवड झालेल्या या विद्यार्थ्यांनी जर्मनीमध्ये विविध औद्योगिक व संशोधनात्मक प्रकल्पांवर प्रभावी काम करत आधुनिक तंत्रज्ञान, नवे सॉफटवेअर आणि अत्याधुनिक संशोधन पध्दती आत्मसात केल्या. यामुळे त्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षण प्रणालीचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. प्रशिक्षण दरम्यान विद्यार्थ्यांनी टेक्निकल टेक्स्टाईल्स, इनोव्हेटीव्ह व सस्टेनेबल टेक्स्टाईल्स, फिनिशींग, कॉम्पुटर सायन्स, स्फॉटवेअर व एआय या अत्याधुनिक विषयांचा सखोल अभ्यास केला. तसेच आंतरराष्ट्रीय संशोधकांशी संवाद साधत त्यांनी आपली संशोधन दृष्टी अधिक व्यापक केली.
सदर विद्यार्थ्यांनी हॉफ विद्यापीठ येथे शिक्षण संपादन करुन सहाव्या सेमिस्टरची शिक्षण पूर्ण करीत ते सातव्या सेमिस्टरसाठी डीकेटीई येथे जुलै २०२६ मध्ये रुजू होणार आहेत. डीकेटीई ही एम्पॉवर्ड अॅटोनोमास संस्था असल्यामुळे निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना मिळालेले मार्कस क्रेडीटच्या स्वरुपात येथील डीकेटीईच्या मार्कशिटमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत.
टेक्सटाईल मधून आयुष अग्रवाल, आयुष लांडगे,तन्वी सागावकर,मृदुल महाजन व दिनेश्वर जयक्रिशनन तर कॉम्पुटर मधून मृदुल देशमुख,मनाली कुलकर्णी,आर्या चौगुले,सम्मेद कनवाडे व सोमेश शर्मा हे विद्यार्थी हॉफ येथे प्रशिक्षण घेत आहेत. युरोपमध्ये उच्च दर्जाचे प्रशिक्षण उपलब्ध करुन देत डीकेटीईने शैक्षणिक क्षेत्रातील आपली गगनभरारी सिध्द केली आहे.
संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ सौ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांना डीकेटीई इन्स्टिटयूटच्या संचालिका प्रा. डॉ. सौ. एल.एस.आडमुठे, उपसंचालक प्रा. डॉ.यु.जे.पाटील, विभागप्रमुख डॉ डी.व्ही.कोदवडे व डॉ टी.आय.बागबान यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.