नागावमध्ये भीषण आगीचा तांडव! स्क्रॅप गोडाऊन जळून खाक; ३५ लाखांचे नुकसान
schedule23 Aug 26 person by visibility 313 categoryगुन्हे
नागाव : येथील गट क्रमांक ४७५ मध्ये आज दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास एका प्लास्टिक स्क्रॅप गोडाऊनला भीषण आग लागली. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले असून, संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती ग्राम महसूल अधिकारी नागाव यांनी दिली आहे.
नागाव येथील राकेश राजाराम कोळी आणि रघुनाथ राऊ समडोळे यांच्या जागेत जावेद मोमीन व परवेज रफीक सोबरे यांचे स्क्रॅपचे गोडाऊन आहे. आज दुपारी अचानक लागलेल्या या आगीने काही क्षणातच उग्र रूप धारण केले.
जावेद मोमीन यांच्या गोडाऊनमध्ये ५० ते ५५ टन प्लास्टिक स्क्रॅप साठवलेले होते. आगीच्या भक्ष्यस्थानी पडून त्यांचे अंदाजे २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
परवेज सोबरे यांच्या गोडाऊनमधील ३० ते ३५ टन स्क्रॅप जळून खाक झाले असून, यात अंदाजे ८ ते १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
गोडाऊनला ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि यंत्रणेने धाव घेतली. आगीची तीव्रता इतनी जास्त होती की आकाशात काळ्या धुराचे लोट दूरवर दिसत होते.
गोडाऊनमध्ये प्लास्टिक आणि मोठ्या प्रमाणावर टाकाऊ साहित्य असल्यामुळे आग झपाट्याने पसरली. मात्र, वेळीच खबरदारी घेतल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी पुढील तपास संबंधित यंत्रणेमार्फत सुरू आहे.
सदर दुर्घटनेबाबत प्रशासनाकडून नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू असून, या परिसरातील इतर गोडाऊनच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.