एकात्मिक कर प्रणालीतून कर वसुलीला गती; नागरिकांना मिळणार सुलभ सेवा
schedule23 Aug 26 person by visibility 148 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : महापालिकेच्या महसूलवाढीसाठी घरफाळा, पाणीपट्टी, परवाना व इस्टेट विभागातील वसुली अधिक प्रभावी करण्यासाठी लिपिकांची ‘एकात्मिक कर सहाय्यक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित लिपिकांची कार्यशाळा आज नर्सरी बाग येथील शाहू समाधीस्थळा शेजारील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉलमध्ये आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.
आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी यावेळी मार्गदर्शन करताना महापालिकेच्या वसुली विभागाने यंदा मागील वर्षाच्या तुलनेत किमान १५० कोटी रुपयांची अतिरिक्त वसुली करण्याचे उद्दिष्ट ठेवावे असे निर्देश दिले. कर वसुलीबरोबरच पाणीपट्टी, परवाना शुल्क, गाळे, फेरीवाले, जाहिरात फलक, अनधिकृत बांधकामे व नळ कनेक्शन यांचे सर्वेक्षण करून प्रत्येक मालमत्तेचा अद्ययावत डिजिटल अभिलेख तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नोव्हेंबरपर्यंत किमान ६० टक्के वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
मोठ्या थकबाकीदारांविरोधात नोटीस, जप्ती, सील, पाणीपुरवठा खंडित करणे तसेच आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. सुमारे दोन लाख नोटिसा बजावण्याचे उद्दिष्ट असून अनधिकृत नळ कनेक्शन नियमित करण्यासाठी २० दिवसांची अंतिम मुदत देण्यात येणार आहे. त्यानंतर कठोर कारवाई केली जाणार आहे.
महापौर रूपाराणी निकम यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारून परिणामकारक काम करण्याचे आवाहन केले. “आता कोणत्याही कामासाठी सबबी नकोत; कामातून परिणाम दिसला पाहिजे. पुढील पाच वर्षे शहराच्या विकासासाठी सातत्याने काम करायचे आहे,” असे त्यांनी सांगितले.
उप आयुक्त परितोष कंकाळ यांनी प्रेझेंटेशनद्वारे एकात्मिक वसुलीची कार्यपद्धती स्पष्ट केली. प्रत्येक कर सहाय्यकाकडे सुमारे १२०० ते १५०० मालमत्तांचे क्षेत्र देण्यात येणार असून युनिक प्रॉपर्टी आयडी, ऑनलाइन डेटाबेस, मोबाईल ॲप, जीपीएस आधारित क्षेत्रभेटी आणि रिअल टाईम अहवाल यांचा वापर केला जाणार आहे.
यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपायुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाने, शिंदे, विजय पाटील संजय सरनाईक राम काटकर जल अभियंता हर्षित घाटगे व अधिकारी, 150 कर्मचारी उपस्थित होते.