कोल्हापूर पोलिसांचा गुन्हेगारांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’! रेकॉर्डवरील १६० सराईतांची उचलबांगडी
schedule11 Jul 26 person by visibility 211 categoryगुन्हे
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहराच्या विविध भागांत कार्यरत असलेल्या १६० पेक्षा जास्त सराईत गुन्हेगारांना एकाच वेळी शाहूपुरी पोलिस ठाण्यात बोलावून पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. गुन्हेगारांच्या मुजोरीला आळा घालण्यासाठी हा एक ‘सर्जिकल स्ट्राईक’ मानला जात आहे.
राजाराजपुरी, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी आणि जुना राजवाडा या परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलिसांनी या कारवाईत लक्ष्य केले आहे. खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, दहशत माजवणे आणि जामिनावर बाहेर असलेले विविध गंभीर गुन्ह्यांतील आरोपींचा यामध्ये समावेश आहे. संबंधित गुन्हेगारांची सद्यस्थिती, त्यांचे सध्याचे कार्यक्षेत्र, व्यवसाय आणि हालचालींची सखोल माहिती पोलिसांनी या कारवाईदरम्यान तपासून घेतली.
यावेळी शहर पोलिस उपाधीक्षक प्रिया पाटील यांनी गुन्हेगारांना खडे बोल सुनावले आहेत. "पुन्हा गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारल्यास कोणतीही गय केली जाणार नाही," असा स्पष्ट आणि कडक इशारा त्यांनी दिला आहे. प्रत्येक पोलिस अधिकाऱ्याला त्यांच्या हद्दीतील गुन्हेगारांची अचूक माहिती ठेवण्याचे आणि त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात पुन्हा गुन्हेगारी करणारऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अधिक मजबूत करणे आणि गुन्हेगारीला आळा घालणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेमध्ये शहरातील चार पोलिस स्टेशनचे तपास पथक, गोपनीय पथक आणि सर्व प्रभारी अधिकारी सहभागी झाले होते. कोल्हापूर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे शहरात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.