शिक्षक मतदारसंघ निवडणूक: प्रफुल्ल तावरे यांचा जयंत आसगावकर यांना जाहीर पाठिंबा
schedule21 Oct 26 person by visibility 220 categoryराजकीय
◼️महायुतीकडून पैशांचा व ‘लक्ष्मीदर्शना’चा गैरवापर; आमदार सतेज पाटील यांचा गंभीर आरोप
कोल्हापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार जयंत आसगावकर यांना शिक्षक उमेदवार प्रफुल्ल तावरे यांनी आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. बुधवार, २१ ऑक्टोबर रोजी अजिंक्यतारा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार सतेज पाटील यांनी ही माहिती दिली. यावेळी आमदार जयंत आसगावकर आणि प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले की, बारामती येथील शिक्षण संस्थेचे प्रमुख तसेच क्रेडाईचे पदाधिकारी असलेले प्रफुल्ल तावरे यांनी उच्च शिक्षण क्षेत्रातील व शिक्षकांच्या अनेक अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने काम केले आहे. त्यांनी या निवडणुकीत मोठी पूर्वतयारी केली होती. मात्र, समविचारी मतांची विभागणी टाळण्यासाठी आणि पुरोगामी विचारांचा विजय सुकर व्हावा म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आवाहनाला मान देऊन तारे यांनी आसगावकर यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या पाठिंब्यामुळे महाविकास आघाडीची ताकद लक्षणीयरीत्या वाढली असून आसगावकर यांचा विजय सुकर झाल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
◼️महायुतीकडून 'लक्ष्मीदर्शन'; सतेज पाटलांचा घणाघात
यावेळी आमदार सतेज पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत यापूर्वी कधीही न झालेला पैशांचा व ‘लक्ष्मीदर्शना’चा प्रकार महायुतीच्या उमेदवारांकडून सुरू असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. पाचही जिल्ह्यांमध्ये मतदारांना प्रलोभने दाखवली जात असून हे अत्यंत दुर्दैवी आहे. कामाच्या आणि धोरणांच्या जोरावर मते मागण्याऐवजी पैशांचा वापर करून ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका त्यांनी केली.
◼️शिक्षकांनी महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी मतदान करावे: आवाहन
"ही निवडणूक केवळ राजकीय नसून महाराष्ट्राच्या शिक्षणाचे आणि संस्थांचे भवितव्य टिकवण्याची लढाई आहे. आज शिक्षण क्षेत्राची झालेली दुरवस्था पाहता ‘शाळा वाचवा’ अशी मोहीम राबवण्याची वेळ आली आहे.
🔵 शिक्षणाच्या हितासाठी व मतविभागणी टाळण्यासाठीच आसगावकरांना पाठिंबा: प्रफुल्ल तावरे
"शिक्षण व्यवस्थेत सध्या चुकीच्या पद्धतीने मोठे बदल घडत आहेत. अशा परिस्थितीत पुरोगामी आणि समविचारी मतांचे विभाजन होऊन चुकीचा उमेदवार निवडून आल्यास समाजाचे मोठे नुकसान होईल. हे नुकसान टाळण्यासाठी आणि शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठीच महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार जयंत आसगावकर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे," अशी स्पष्ट भूमिका शिक्षक उमेदवार प्रफुल्ल तावरे यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
यावेळी निर्णय प्रक्रियेबाबत माहिती देताना तावरे म्हणाले की, "मी शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरून निवडणुकीची पूर्ण तयारी केली होती. मात्र, आमदार सतेज पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मला दूरध्वनीवरून संपर्क साधला. समविचारी मतांमध्ये फूट पडू नये म्हणून पाठिंब्याबाबत विचार करण्याची विनंती त्यांनी केली. त्यांचे म्हणणे मला रास्त वाटल्याने मी तातडीने या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला."
आपल्या पार्श्वभूमीचा उल्लेख करत तावरे पुढे म्हणाले, "मी स्वतः एका शिक्षकाचा मुलगा असून शिक्षक म्हणून तसेच शिक्षण संस्था आणि एव्हिएशन ट्रेनिंगच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत आहे. शिक्षण पद्धतीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी मी 'इथे जास्त घडते' हे पुस्तकही लिहिले आहे. जयंत आसगावकर हे माझे जुने स्नेही असून शिक्षकांसाठी मला जे कार्य करायचे होते, ते त्यांच्या माध्यमातून उत्तमरीत्या पूर्ण होऊ शकते, असा मला पूर्ण विश्वास आहे."
आपल्या सहकाऱ्यांना व मतदारांना आवाहन करताना ते म्हणाले, "गेल्या काही दिवसांत पाचही जिल्ह्यांत माझ्या सहकाऱ्यांनी आणि मित्रपरिवाराने मोठ्या कष्टाने प्रचार केला होता. काही अपरिहार्य व व्यापक हिताच्या कारणांमुळे मला हा निर्णय घ्यावा लागत आहे. त्यामुळे आता उर्वरित दोन दिवसांत माझ्या सर्व सहकाऱ्यांनी जयंत आसगावकर यांनाच पहिल्या पसंतीचे मतदान करण्याचे आवाहन मतदारांना करावे."