SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
घरफाळा थकबाकीदारांच्या 2 व्यावसायिक आस्थापना सीलक्षयरोगाचे प्रसारमार्ग, लवकर निदान व मोफत उपचारांबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीकेडीसीसी बँकेकडून संस्थांना डिव्हीडंड पोटी ३१ कोटी रुपये अदा; कर्मचाऱ्यांना बोनस व अर्धा पगार बक्षीसपोटी १२ कोटी अदाडी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या दोन विद्यार्थ्यांना ‘टॉप २५ ॲम्बेसेडर’मध्ये स्थानइचलकरंजीत कौस्तुभ गावडे यांना वाढता पाठिंबा; शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण!शिक्षक मतदारसंघ निवडणूक: प्रफुल्ल तावरे यांचा जयंत आसगावकर यांना जाहीर पाठिंबासुसंस्कृत समाज निर्मितीसाठी साहित्य महत्वाचे : डाॅ. हूबनाथ पांडेयमंगळवेढ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला बळ; विजयासाठी बूथनिहाय नियोजन!पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी चंद्रकांतदादांचा पुण्यात घरोघरी प्रचारपोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

जाहिरात

 

क्षयरोगाचे प्रसारमार्ग, लवकर निदान व मोफत उपचारांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती

schedule21 Oct 26 person by visibility 192 categoryमहानगरपालिका

◼️नवरात्र उत्सवात विद्यार्थ्यांनी दिला क्षयरोग प्रतिबंध व उपचाराचा संदेश

कोल्हापूर : क्षयरोगमुक्त भारताच्या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी आणि समाजामध्ये क्षयरोगाविषयी असलेले गैरसमज दूर करून जनजागृती करण्याच्या उद्देशाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या क्षयरोग नियंत्रण सोसायटीच्या वतीने नवरात्री उत्सव २०२६ च्या कालावधीत अभिनव जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. सायबर महाविद्यालयाच्या समाजकार्य विभागातील विद्यार्थ्यांच्या सहभागातून आणि महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या सहकार्याने के.एम.टी. बसमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांपर्यंत क्षयरोग प्रतिबंध, निदान व उपचारांचा संदेश पोहोचविण्यात आला. उपायुक्त किरणकुमार धनवाडे आणि आरोग्याधिकारी तथा शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

नवरात्री उत्सवातील देवी श्री अंबाबाईच्या भक्तिभावाला सामाजिक प्रबोधनाची जोड देत समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी देवी अंबाबाईच्या रूपात प्रवाशांशी संवाद साधला. धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवाच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्याचा संदेश सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि अन्य प्रवाशांना क्षयरोगाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि उपलब्ध उपचारांबाबत माहिती देण्यात आली.

या उपक्रमादरम्यान क्षयरोग हा जिवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार असून, प्रामुख्याने फुफ्फुसांवर त्याचा परिणाम होतो, याबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली. दोन आठवडे किंवा त्यापेक्षा अधिक काळ खोकला राहणे, ताप येणे, रात्री घाम येणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, थकवा जाणवणे किंवा कफातून रक्त पडणे अशी लक्षणे आढळल्यास विलंब न करता जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले.

वेळेवर निदान आणि पूर्ण उपचारांनी क्षयरोग बरा होऊ शकतो

क्षयरोगाचे वेळेवर निदान झाल्यास योग्य औषधोपचारांनी हा आजार बरा होऊ शकतो. शासकीय आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या क्षयरोग निदान सेवा आणि पात्र रुग्णांसाठी शासनाच्या कार्यक्रमांतर्गत उपलब्ध मोफत उपचारांची माहितीही प्रवाशांना देण्यात आली. क्षयरोगाचे निदान झालेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचारांचा निर्धारित कालावधी पूर्ण करावा. औषधे मध्येच बंद करू नयेत आणि नियमित वैद्यकीय पाठपुरावा करावा, असे आवाहन करण्यात आले. उपचार अपूर्ण राहिल्यास आजार पुन्हा बळावण्याचा आणि औषधांना प्रतिकारक्षम क्षयरोग निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो, याबाबतही जनजागृती करण्यात आली.

◼️क्षयरुग्णांशी भेदभाव न करता सहकार्य करा

क्षयरोग झालेल्या व्यक्तीला समाजापासून दूर ठेवणे किंवा तिच्याशी भेदभाव करणे चुकीचे आहे. क्षयरुग्णांना कुटुंबीयांचा आधार, समाजाचे सहकार्य आणि सन्मानपूर्वक वागणूक मिळणे आवश्यक आहे, हा सामाजिक संदेशही या उपक्रमातून देण्यात आला. के.एम.टी. बससेवेच्या माध्यमातून दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांपर्यंत आरोग्यविषयक माहिती पोहोचविण्याचा हा उपक्रम प्रभावी ठरला. देवी अंबाबाईच्या रूपातील विद्यार्थ्यांनी केलेल्या संवादामुळे धार्मिक श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि सार्वजनिक आरोग्य यांचा सुंदर संगम साधण्यात आला. क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागासोबतच नागरिक, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. क्षयरोगाची लक्षणे ओळखणे, वेळेवर तपासणी करून घेणे, निदान झालेल्या रुग्णांना उपचार पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांच्याशी भेदभाव टाळणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे.

‘लक्षणे ओळखा, वेळेवर तपासणी करा, उपचार पूर्ण करा आणि क्षयरुग्णांशी भेदभाव टाळा’ हा संदेश या उपक्रमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. अशा लोकाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून कोल्हापूर शहरात क्षयरोगाविषयी जनजागृती वाढवून क्षयरोगमुक्त समाजनिर्मितीस हातभार लावण्याचा महानगरपालिका क्षयरोग नियंत्रण सोसायटीचा प्रयत्न आहे.

क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी विलंब न करता जवळच्या शासकीय आरोग्य केंद्राशी संपर्क साधून तपासणी व उपचार करून घ्यावेत आणि क्षयरोगमुक्त कोल्हापूरच्या निर्मितीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes