निधीअभावी बंद पडलेले 'आपला दवाखाने' तात्काळ सुरू करा; अन्यथा आरोग्यमंत्र्यांची गाडी अडवू
schedule26 Nov 26 person by visibility 148 categoryसामाजिक
◼️करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा इशारा; आरोग्य विभागाला निवेदन
कोल्हापूर : शहरातील पाच 'हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने' निधीअभावी ठेकेदारांकडून बंद करण्यात आले आहेत. गोरगरीब आणि कष्टकरी नागरिकांची मोठी गैरसोय लक्षात घेता, हे दवाखाने तात्काळ सुरू करावेत, अन्यथा अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी ढोल वाजवून आंदोलन करण्यासह आरोग्यमंत्र्यांची गाडी अडवण्यात येईल, असा इशारा करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. या मागणीचे निवेदन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनंदा गायकवाड यांना देण्यात आले.
शहरात सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत एकूण १४ 'आपला दवाखाने' कार्यरत होते. यापैकी लोणार वसाहत (शाहू मिल कॉलनी), जिवबानाना पार्क, कनाननगर, राजेंद्रनगर झोपडपट्टी आणि ब्रम्हपुरी टेकडी येथील पाच दवाखाने चालवण्याचा ठेका 'एच.एस.सी.सी. इंडिया प्रा. लि.' या खाजगी कंपनीला देण्यात आला होता. मात्र, १ नोव्हेंबरपासून निधीअभावी हे पाचही दवाखाने बंद ठेवण्यात आले आहेत. दुपारी २ ते रात्री १० या वेळेत सुरू राहणाऱ्या या दवाखान्यांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत उपचार मिळत असल्याने मोलमजुरी करणारे कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच उचगाव, गडमुडशिंगी, सरनोबतवाडी, उजळाईवाडी येथील शेकडो रुग्णांना मोठा आधार होता. दवाखाने बंद झाल्याने सर्वसामान्यांचे मोठे हाल होत असल्याचा आरोप शिवसेनेने निवेदनाद्वारे केला आहे.
यावेळी बोलताना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव म्हणाले की, "बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मते मागून सत्तेत आलेल्या महायुती सरकारच्या काळात त्यांच्याच नावाचे दवाखाने बंद पडत आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री याच जिल्ह्यातील असूनही या गंभीर प्रकाराकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे."
शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो हातात घेऊन आरोग्य विभागाच्या कार्यालयात हे निवेदन सादर केले. डॉ. सुनंदा गायकवाड यांनी उपसंचालक (आरोग्य सेवा) यांच्या वतीने निवेदन स्वीकारून हा विषय तातडीने शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले.
यावेळी शहरप्रमुख विशाल देवकुळे, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, अवधूत साळोखे, राजू सांगावकर, राहुल गिरुले, संदीप दळवी, हर्षल पाटील, दिपाली शिंदे, जितू कुबडे, दत्ता फराकटे, सचिन नागटिळक, बाळासो नलवडे, योगेश लोहार, दीपक पोपटानी, दीपक धिंग, सुनील पारपाणी, कैलास जाधव, बाबुराव पाटील, आबा जाधव, रंगराव पाटील, राहुल माने, सुबहान फुलवाले यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.