सेवा आयुष्यभराची… सुरक्षितता निवृत्तीनंतरची! जुनी पेन्शनसाठी आमदार कौस्तुभ गावडे कटिबद्ध!
schedule25 Nov 26 person by visibility 112 categoryशैक्षणिक
◼️जुन्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करण्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आश्वासन
ठाणे : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न हा केवळ आर्थिक नसून त्यांच्या आयुष्यभराच्या सेवेनंतरच्या सन्मानाचा आणि सामाजिक सुरक्षिततेचा विषय आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असून, हा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आपला पाठपुरावा सुरूच राहील, असा ठाम निर्धार पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी उपसभापती तथा लोकनेते स्वर्गीय वसंतरावजी डावखरे यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृती जपण्याच्या भावनेतून आयोजित करण्यात आलेला ‘वसंतस्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार गुणगौरव सोहळा-२०२६’ भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे येथील मो. ह. विद्यालय व के. रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालयात उत्साहात संपन्न झाला. यावेळी आमदार कौस्तुभ गावडे यांनी जुन्या पेन्शन योजनेच्या प्रश्नाकडे प्रदेशाध्यक्षांचे लक्ष वेधले. या सोहळ्यासाठी प्रदेश सरचिटणीस आमदार ॲड.माधवीताई नाईक, मा. निरंजन डावखरे, कोकण शिक्षक आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे, भाजप शिक्षक प्रकोष्ठचे प्रदेश प्रभारी श्री. सुनील लोढा, ठाणे उपमहापौर श्री. कृष्णा पाटील हे उपस्थित होते.
आमदार कौस्तुभ गावडे यांची जुन्या पेन्शन योजनेविषयीची तळमळ आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा अधोरेखित करताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, कौस्तुभ गावडे जेव्हा जेव्हा भेटतात, तेव्हा प्रत्येक वेळी ते केवळ जुन्या पेन्शन योजनेचाच विषय प्राधान्याने मांडतात. शिक्षकांच्या या प्रश्नाबाबत त्यांची असलेली आस्था आणि तळमळ निश्चितच कौतुकास्पद आहे. जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विशेष बैठक आयोजित करण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
शिक्षकांनी आपले संपूर्ण आयुष्य विद्यार्थी घडविण्यासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी समर्पित केले आहे. अशा शिक्षकांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता मिळणे हा त्यांचा हक्क आहे. त्यामुळे जुन्या पेन्शनचा प्रश्न हा आपल्या कार्यसूचीतील सर्वोच्च प्राधान्याचा विषय असून, शासनाच्या स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी भूमिका आमदार कौस्तुभ गावडे यांनी यावेळी मांडली.
‘सेवा आयुष्यभराची… सुरक्षितता निवृत्तीनंतरची!’ या भावनेतून जुन्या पेन्शनच्या लढ्याला राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर अधिक बळ मिळत असल्याचे या कार्यक्रमाच्या निमित्ताने अधोरेखित झाले. शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी विधान परिषदेत आवाज उठविण्याबरोबरच राज्याच्या नेतृत्वाकडे सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार आमदार कौस्तुभ गावडे यांनी व्यक्त केला.