जुगुळ-खिद्रापूर पुलाचा भूसंपादनाचा तिढा लवकरच सुटणार; आमदार यड्रावकर यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा
schedule24 Nov 26 person by visibility 119 categoryराज्य
खिद्रापूर : महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांना जोडणारा जुगुळ-खिद्रापूर पूल गेल्या अनेक वर्षांपासून भूसंपादनाच्या अडचणीमुळे रखडला आहे. सन २०१७-१८ मध्ये कर्नाटकचे तत्कालीन आमदार प्रकाशअण्णा हुक्केरी यांच्या माध्यमातून या पुलाला मंजुरी मिळाली. महापुराच्या काळात महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांतील सीमावर्ती गावांना दळणवळणासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध व्हावा, तसेच पूरपरिस्थितीत नागरिकांना मोठा दिलासा मिळावा, या उद्देशाने या पुलाची संकल्पना पुढे आली होती. २१.२ कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाच्या या पुलाचे काम २०१९-२० मध्ये सुरू करण्यात आले. २०२२-२३ पर्यंत पुलाचे बहुतांश काम पूर्णत्वास गेले. मात्र, महाराष्ट्राच्या हद्दीतील खिद्रापूर गावात भूसंपादनाचा प्रश्न निर्माण झाल्याने पुलाचे काम अपूर्ण राहिले. पुलासाठी चार शेतकऱ्यांची एकूण ४१ गुंठे जमीन आवश्यक होती. २०२३ पासून सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधून जमीन संपादन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकाच गटात अनेक हिस्सेदार असल्याने सर्वांना एकत्र आणून खरेदीदस्त करण्यामध्ये अडचणी येत होत्या.
डिसेंबर २०२३ मध्ये याबाबत तत्कालीन प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतरही प्रश्न मार्गी न लागल्याने मे २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी बहिष्काराचा निर्णय मागे घेतला. त्यानंतर अडीचशेहून अधिक ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा बजावल्या.
यादरम्यान ग्रामस्थांच्या मागणीनुसार पुलाच्या भरावामुळे परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याचा निचरा आणि शेतीच्या दळणवळणाबाबत अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने कमानी मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा केला. त्यानुसार कमानी मंजूर झाल्यानंतर त्यासाठी नव्याने प्रस्ताव तयार करण्यात आला आणि पुन्हा जमीन मोजणी करण्यात आली. या मोजणीत इमामशा शिरगुप्पे या चौथ्या शेतकऱ्याची जमीन पुलासाठी आवश्यक नसल्याचे महसूल विभागाच्या निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याचे नाव भूसंपादन प्रक्रियेतून कमी करण्यात आले.
सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर जून आणि जुलै २०२५ मध्ये कदम आणि खोत या शेतकऱ्यांचे खरेदीदस्त पूर्ण झाले. मात्र, लाटकर यांच्या १६ गुंठे जमिनीचा प्रश्न कायम राहिला. प्रामुख्याने शशिकांत लाटकर यांच्या वाढीव जमीन दर, पूर संरक्षक भिंत आणि पर्यायी जागा या तीन मागण्या होत्या, पण प्रशासन, आमदार आणि ग्रामस्थ यांच्या मध्यस्थीने त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला.
फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये संबंधित शेतकरी खरेदीदस्त करण्यासाठी आले असता दस्तातील काही गोष्टी त्यांना अमान्य असल्यामुळे सदरची प्रक्रिया पुन्हा रखडली.
वारंवार प्रयत्न करूनही खरेदीदस्त पूर्ण होत नसल्याने प्रशासनाने आता सक्तीने भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी सामाजिक परिणाम मूल्यांकनातून (SIA) सूट मिळण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करून विभागीय कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रियाही सुरू असून, येत्या काही महिन्यांत त्यातून मार्ग निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
*दरम्यान, पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीही सातत्याने प्रयत्न केले. या भूसंपादन प्रक्रियेत महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी ७५ लाख रुपयांचा निधी देखील मंजूर करून आणला. जमीन अधिग्रहण करीत असताना अनेक शेतकऱ्यांचा यामध्ये विरोध होता त्या शेतकऱ्यांसमवेत बैठका घेऊन जमीन अधिग्रहणाचा प्रश्न मार्गी लावला, अद्याप एका शेतकऱ्याचा जमीन अधिग्रहण करण्यासाठी विरोध असून यासाठीही संबंधित महसूल आणि बांधकाम विभागाला सूचना दिल्या आहेत.
भूसंपादनातील अडचणी दूर करून पुलाचे काम मार्गी लागावे, यासाठी त्यांनी संबंधित प्रशासन आणि विभागांशी समन्वय साधला. पुलाच्या भरावामुळे परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याचा निचरा आणि शेतीच्या दळणवळणाबाबत अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने कमानी मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा देखील केला आहे.
एकीकडे कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडणाऱ्या पुलाचे बहुतांश काम पूर्ण झाले असताना केवळ उर्वरित भूसंपादनाच्या प्रश्नामुळे हा पूल वाहतुकीसाठी खुला होऊ शकलेला नाही. ग्रामस्थांनी वेळेवेळी केलेल्या पाठपुराव्यानंतरही हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. आता प्रशासनाच्या सक्तीच्या भूसंपादन प्रक्रियेतून हा प्रश्न लवकरच मार्गी लागून यातून कायमचा मार्ग निघणार आहे. त्यासाठी लोकांनी थोडा संयम बाळगावा अशी विनंती द्वारपाल लडगे, हिदायत मुजावर, डॉ. जिनेंद्र कागवडे, हैदरखान मोकाशी, सुरेश यड्रावे, रावसाहेब रायनाडे, दयानंद खानोरे, प्रकाश रायनाडे, अशपाक ढालाईत, राजीव सुंके, रणधीर लडगे, अभिनंदन सुंके, अप्पासो काळे त्यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.