स्वातंत्र्यदिनी ‘असाक्षरमुक्त गाव’ शपथ घेण्याचे आवाहन
schedule11 Aug 26 person by visibility 198 categoryराज्य
कोल्हापूर : केंद्र पुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रम महाराष्ट्रात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. सन 2022 ते 2027 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा, गट व शाळा स्तरावर विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसारासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रत्येक शाळेत ‘असाक्षरमुक्त गाव’ करण्याची शपथ घेण्यात यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (योजना) अनुराधा म्हेत्रे यांनी केले आहे.
जिल्हास्तरीय नियामक परिषद तथा जिल्हाधिकारी उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाचे अध्यक्ष असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.
गावातील असाक्षर व्यक्तींना साक्षर करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, स्वयंसेवक तसेच नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन हा संकल्प पूर्ण करण्यासाठी योगदान द्यावे. ‘असाक्षरमुक्त गाव’ अभियानाच्या माध्यमातून 100 टक्के साक्षर महाराष्ट्र घडविण्यास निश्चितच मदत होणार आहे.