कोल्हापूर: तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण व जबरी चोरी करणारे ३ जण जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
schedule09 Oct 26 person by visibility 198 categoryगुन्हे
कोल्हापूर : उजळाईवाडी येथे एका तरुणाचे अपहरण करून त्याला लोखंडी दांडक्याने व बेल्टने गंभीर दुखापत करत जबरी चोरी करणाऱ्या तिन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या काही दिवसांतच बेड्या ठोकल्या आहेत. ही धडक कारवाई ९ ऑक्टोबर रोजी राजाराम तलाव परिसरात करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, दिनांक १ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी समीर गुलाब शेख (वय ३३, रा. नवीन वाशी नाका, नाना पाटील नगर, कोल्हापूर) हे उजळाईवाडी येथील विमानतळ रोडवर असताना आरोपींनी त्यांना अडवले. "तू आमचे मोबाईल हॅक करत आहेस," असा संशय व राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीला डोक्यात व पाठीवर लोखंडी दांडक्याने, चमड्याच्या बेल्टने तसेच डांबरी काटा व परफ्युम गॅस सिलिंडरने बेदम मारहाण केली. त्यानंतर तवंदी घाट व कर्नाटक भागात नेऊन फिर्यादीच्या खिशातील ३२,००० रुपये जबरीने काढून घेतले आणि मोबाईलद्वारे ऑनलाइन १३,६०० रुपये ट्रान्सफर करून घेतले. याप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल आणि अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी स्वतंत्र पथक नेमून समांतर तपास सुरू केला होता. दरम्यान, पोलीस अंमलदार वैभव पाटील व संतोष बरगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पथकाने राजाराम तलाव परिसरात सापळा रचून १) सलमान अस्लममुहम्मद शेख उर्फ पठाण (वय ३४, रा. गोवंडी, मुंबई), २) हर्षवर्धन गणेश खडगे (वय १९, रा. निप्पाणी, कर्नाटक) आणि ३) रजत सचिन जाधव (वय १९, रा. निप्पाणी, कर्नाटक) या तिन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून, त्यांना पुढील तपासासाठी गोकुळ शिरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.