शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा यड्रावकर बंधू चालवत आहेत : उद्योग मंत्री उदय सामंत
schedule21 Jun 26 person by visibility 214 categoryराज्य
* जयसिंगपुरात राजर्षी शाहू महाराज व जयसिंग महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण
जयसिंगपूर : छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर या दोन्ही बंधूंनी जपला आहे. सामाजिक न्याय, शिक्षण, उद्योग आणि आधुनिक विकासाच्या संकल्पनांची पायाभरणी शाहू महाराजांनीच केली. राधानगरी धरणासारख्या अभियांत्रिकी चमत्कारांपासून नियोजनबद्ध शहर विकासापर्यंत त्यांच्या दूरदृष्टीचा ठसा आजही कायम आहे. त्यांचे विचारांचा वारसा दोघे यड्रावकर बंधू पुढे चालवीत आहेत. त्यांनी आपल्या मतदारसंघात केलेली विकास कामे पाहून मी भारावून गेलो असून माझ्या मतदारसंघात सुद्धा शिरोळच्या धर्तीवर विकास साधणार आहे. शिरोळ तालुक्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी उभारण्यात येणाऱ्या क्लस्टर उद्योग प्रकल्पालाही उद्योग विभागाकडून तातडीने मान्यता देण्यात येईल, अशी घोषणा करत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली.
जयसिंगपुरात आज राजर्षी शाहू महाराज व जयसिंग महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण प्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत बोलत होते.
यावेळी बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, आमदार यड्रावकर यांनी ग्रामीण भागात एमआयडीसी उभारण्याची मागणी सातत्याने लावून धरली असून उद्योगांना आवश्यक पाणी, वीज आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.
महिलांसाठी स्वतंत्र क्लस्टर उद्योग उभारण्याचा प्रस्ताव उद्योग विभागाकडे पाठविल्यानंतर अवघ्या २४ तासांत मंजुरी देण्याची तयारी असल्याचेही त्यांनी जाहीर केले. यावेळी त्यांनी आमदार यड्रावकर यांच्या विकासकामांचे विशेष कौतुक करत मतदारसंघासाठी तब्बल २२०० कोटी रुपयांचा निधी आणून त्यांनी विकासाचा नवा आदर्श निर्माण केल्याचे सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विविध विकास प्रकल्पांपर्यंत प्रभावी नेतृत्व करत त्यांनी मतदारसंघाला विकासाच्या नव्या उंचीवर नेल्याचे सामंत यांनी गौरवोद्गार काढले.
याप्रसंगी बोलताना खासदार छत्रपती शाहू महाराज म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीमुळे उभारलेले हे शहर आजही विकासाचा आदर्श आहे. छत्रपती शाहू महाराज व श्रीमंत जयसिंग महाराज यांचे स्मारक एकात चौकात असणे ही जयसिंगपूरची मोठी ओळख असून, या दोन स्मारकांमुळे शहराची उंची आणि ऐतिहासिक महत्त्व अधिक वाढले आहे. आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर आणि नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली शहरात सुरू असलेल्या विकासकामांचे कौतुक करत, त्यांनी हाती घेतलेली कामे पूर्णत्वास नेण्याची कार्यशैली आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार काढले. जात, धर्म व पक्षीय भेद बाजूला ठेवून जनतेच्या हितासाठी काम केल्यास सर्वांगीण विकास साधता येतो, असे सांगत जयसिंगपूर महानगरपालिकेकडे वाटचाल करत असून मोठ्या निधीच्या माध्यमातून शहराचा विकास वेगाने सुरू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
खासदार धैर्यशील माने म्हणाले, जयसिंगपूरच्या ऐतिहासिक वारशाचा गौरव करताना राजर्षी शाहू महाराज आणि जयसिंगराव महाराज यांच्या दूरदृष्टीमुळे हे शहर आदर्श नगरी म्हणून विकसित झाले आहे. शाहू महाराजांनी आपल्या वडिलांच्या नावाने वसवलेली ही जयसिंगपूर नगरी राज्यातील एकमेव उदाहरण आहे.
आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर आणि नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली शहरात होत असलेल्या विकासकामांचे कौतुक करत, जयसिंगपूरचा चेहरामोहरा बदलल्याचे त्यांनी सांगितले. शहरात सुरू असलेली सुमारे २८० कोटी रुपयांची विकासकामे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम, अत्याधुनिक नगरपालिकेची इमारत, सुशोभित रस्ते आणि विविध पायाभूत सुविधा ही विकासाची ठळक उदाहरणे असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिवछत्रपतींचा भव्य पुतळा, उभारण्यात येणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि प्रेरणादायी वास्तूंमुळे जयसिंगपूरची ओळख अधिक उंचावली असून, सर्व समाजघटकांना सोबत घेऊन विकासाचा आदर्श निर्माण करणारे नेतृत्व यड्रावकर बंधूंनी दिल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, जयसिंगपूर नगरीची स्थापना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपले जनकपिता श्रीमंत जयसिंग महाराज यांच्या नावाने केली असून, शेतकरी व सर्वसामान्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी पर्यायी व्यापारी पेठ उभारण्यामागे त्यांची दूरदृष्टी होती. त्यांच्या दृष्टिकोनातून आज शहराची वाटचाल सुरू आहे.
जयसिंगपूर शहराचा विकास व्यापार, उद्योग, शिक्षण आणि आधुनिक नागरी सुविधांच्या माध्यमातून होत असून २४ तास पाणीपुरवठा, अंडरग्राउंड ड्रेनेज, तालुका क्रीडा संकुल, अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा आणि डिजिटल शाळा यांसारखे प्रकल्प राबविल्याची येत आहेत. शिरोळ तालुक्यास स्वतंत्र एमआयडीसी मंजूर झाल्यास ग्रामीण भागातील युवकांना घराजवळ रोजगार उपलब्ध होईल, तसेच प्रस्तावित गारमेंट क्लस्टरमुळे हजारो महिलांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गेल्या काही वर्षांत शासनाच्या सहकार्याने तालुक्यात सुमारे २२०० कोटी रुपयांची विकासकामे मंजूर झाली असून, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, श्रीमंत जयसिंग महाराज यांची स्मारके उभारून नव्या पिढीसमोर प्रेरणादायी विचार जतन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी स्वागत नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी माजी आमदार उल्हास पाटील, गणपतराव पाटील, सावकार मादनाईक, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती श्रध्दाताई गायकवाड, जिल्हा परिषद सदस्या सानिका पाटील यड्रावकर, सभापती मिलिंद कुरणे, कुरुंदवाडच्या नगराध्यक्षा मनिषा डांगे, शिरोळच्या नगराध्यक्षा योगिता कांबळे, उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव, मुख्याधिकारी टीना गवळी, जिल्हा परिषद सदस्या प्रचिता कोळी, उत्तरादेवी शिंदे, जिल्हा परिषद सदस्य अमोल चव्हाण, उपसभापती मनिषा कदम, पंचायत समिती सदस्य बाबासो वनकोरे, दिप्ती जाधव, सिमा म्हैशाळे, प्रविण देसाई, फजलेअली पटेल, अविनाश पाटील, अमरसिंह निकम, विकास कांबळे, दादासो पाटील चिंचवाडकर, रविंद्र ताडे, मिलिंद भिडे, रमेश यळगुडकर, राजेंद्र दाईंगडे, सतिश मलमे, रणजित पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक शिरोळ तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन बबन यादव यांनी केले. आभार बजरंग खामकर यांनी मानले.