SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सोमवारी ‘या’ कारणामुळे बालिंगा पंपिंग स्टेशन राहणार बंद!राज्य शासनाच्या विविध योजनांसह महापालिका स्वनिधीतून १६६ कोटी ९३ लाखांची रस्त्यांची कामे सुरूकोल्हापूर महानगर पालिका : बेकायदेशीर नळ कनेक्शन रितसर करण्यासाठी १० दिवसांची मुदत; त्यानंतर दंडात्मक व फौजदारी कारवाईदत्तवाडचे आरोग्यमंदिर लवकरच जनतेच्या सेवेत : आमदार यड्रावकर देवीदास मिसाळ, कृष्णा ठाकरे यांच्याविरोधात उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच येथे अवमान याचिका दाखलनवापूर येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय आढावा बैठक खुपिरेच्या बलमीम विकास संस्थेच्या संचालकावर कारवाई करावी अन्यथा आत्मदहन; सामाजिक कार्यकर्ते सरदार बंगे यांचा इशाराकोल्हापूरच्या अक्षय मानेचा बँकॉक हायरॉक्स स्पर्धेत डंका; आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा!प्रतिसरकारचे शोषणमुक्त समाजाचे स्वप्न ‘जेन-झी’ने साकारावे: डॉ. भारत पाटणकरडी. वाय. पाटील विद्यापीठ तळसंदेच्या २७१ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

जाहिरात

 

प्रतिसरकारचे शोषणमुक्त समाजाचे स्वप्न ‘जेन-झी’ने साकारावे: डॉ. भारत पाटणकर

schedule14 Aug 26 person by visibility 132 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या दृष्टिकोनातून प्रतिसरकार हे केवळ ब्रिटिश सत्तेविरुद्धचे आंदोलन नव्हते, तर स्त्रीमुक्ती, जातिव्यवस्थेविरोध, जमीनदारशाहीचा अंत आणि सर्व प्रकारच्या शोषणातून मुक्त समाजनिर्मितीचे सुंदर स्वप्न होते. हे स्वप्न अद्याप पूर्ण झालेले नाही; ते साकार करण्याची जबाबदारी आता ‘जेन-झी’ने स्वीकारावी, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारत पाटणकर यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाचे श्रीमती कै. शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन आणि क्रांतिअग्रणी जी.डी. बापू लाड अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘प्रतिसरकारची चळवळ: रणरागिणी रणि ठाकल्या’ या विषयावरील राज्यस्तरीय चर्चासत्राच्या उद्घाटन सत्रात बीजभाषक म्हणून डॉ. पाटणकर आज बोलत होते. मानव्यशास्त्र सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. राजनीश कामत होते, तर, आमदार अरूण लाड, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव प्रमुख उपस्थित होत्या.

डॉ. पाटणकर म्हणाले, प्रतिसरकारची संकल्पना केवळ इंग्रजांना हाकलून देण्यापुरती मर्यादित नव्हती. ब्रिटिशांच्या सत्ताकाळातच स्वातंत्र्यानंतरचा समाज उभा करण्याचा प्रयत्न त्यातून झाला. जनतेने ठरविलेलेच त्या भागात चालावे, या भूमिकेतून समांतर सत्तेची निर्मिती करण्यात आली. स्त्रियांच्या मुक्तीचा कार्यक्रम, जमीनदारांच्या दडपशाहीविरोधातील संघर्ष आणि पिढ्यान्‌पिढ्या कसणाऱ्या कुळांना जमिनीचा हक्क मिळावा, यांसाठी प्रतिसरकारने भूमिका घेतली. न्यायदान मंडळे, सेवा दल, ग्रामस्वच्छता, वाचनालये, सहभोजन, ‘एक गाव एक पाणवठा’ यांसारख्या उपक्रमांतून सामाजिक परिवर्तनाची पायाभरणी करण्यात आली. जातीय विषमता, अस्पृश्यता, सावकारशाही आणि स्त्रियांवरील अन्यायाविरोधात प्रतिसरकारने संघर्ष केला. हा लढा केवळ राजकीय स्वातंत्र्यासाठी नव्हता, तर शोषित समाजाचे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी होता, असे डॉ. पाटणकर यांनी स्पष्ट केले.

प्रतिसरकारमध्ये शेतकरी, बलुतेदार आणि विविध शोषित घटकांतील तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांच्या त्यागातून निर्माण झालेले स्वातंत्र्य केवळ सत्तांतरापुरते मर्यादित न राहता सामाजिक आणि आर्थिक समतेत रूपांतरित व्हावे, ही त्यामागची भूमिका होती. मात्र सर्व प्रकारच्या शोषणाचा अंत करण्याचे प्रतिसरकारचे स्वप्न अद्याप साकार झालेले नाही. त्यामुळे बदलत्या काळात त्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी आजच्या युवा पिढीने पुढाकार घेण्याची आवश्यकता डॉ. पाटणकर यांनी व्यक्त केली.

▪️'आदर्श ग्रामस्वराज्य निर्मितीची चळवळ'
कुलगुरू डॉ. राजनीश कामत अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, प्रतिसरकार चळवळ ही केवळ ब्रिटिश सत्तेविरुद्धची लढाई नव्हती, तर आदर्श ग्रामस्वराज्याची निर्मिती करणारी आणि समाजातील विषमतेवर घाव घालणारी अभिनव चळवळ होती. सातारा-सांगली परिसरात जनमत संघटित करून अन्याय-अत्याचाराविरोधात लढताना प्रतिसरकारने न्यायदान समित्यांच्या माध्यमातून ग्रामराज्याचा प्रयोग केला; गरीब व नाडलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासोबतच दारूबंदी, जुगारबंदी, हुंडाबंदी, गांधी पद्धतीने विवाह आणि अस्पृश्यता निवारण यांसारखे विधायक उपक्रम राबवून सामाजिक स्वराज्याची पायाभरणी केली. या चळवळीच्या इतिहासात पुरुष क्रांतिकारकांच्या योगदानाची नोंद झाली असली, तरी भूमिगत क्रांतिकारकांना आश्रय देणे, संदेश पोहोचविणे, शस्त्रे लपविणे आणि प्रसंगी स्वतः शस्त्र हाती घेणाऱ्या लीलाताई पाटील, इंदुताई पाटणकर, राजमती पाटील यांच्यासह असंख्य रणरागिणींच्या योगदानाला अपेक्षित न्याय मिळालेला नाही. त्यामुळे विस्मृतीत गेलेल्या या स्त्रीशक्तीचा इतिहास संशोधनातून पुढे आणणे आणि तो नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हे आपले कर्तव्य आहे. प्रतिसरकार चळवळ आणि तिच्यातील स्त्रीशक्तीचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र दोन क्रेडिटचा अभ्यासक्रम सुरू करण्याचाही विचार करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

▪️‘आपल्याच सरकारने बापूंना का पकडले?’
यावेळी आमदार अरूण लाड यांनी जी.डी. बापू लाड यांचे प्रतिसरकारमधील कार्य आणि अन्य आठवणींना उजाळा दिला. अत्यंत प्रसिद्धीपराङ्मुख राहून स्वातंत्र्योत्तर कालखंडातही स्वातंत्र्याचे खरे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी बापू अखेरपर्यंत संघर्षशील राहिले. विधिमंडळ सदस्य म्हणून मिळणारे निवृत्तीवेतन स्वतःसाठी अगर कुटुंबासाठी न वापरता ती संपूर्ण रक्कम समाजकार्यासाठीच वापरणारे बापू हे अत्यंत प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते. ब्रिटीश सरकारला सळो की पळो करून सोडणाऱ्या जी.डी. बापूंना स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्याच सरकारने का पकडले आणि तुरुंगात का टाकले, यावरही संशोधकांनी प्रकाश टाकायला हवा, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

यावेळी डॉ. भारती पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. रणधीर शिंदे यांनी परिचय करून दिला. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. नेहा वाडेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. दशरथ पारेकर, डॉ. कपिल राजहंस, वसंतराव मुळीक, डॉ. दीपा श्रावस्ती यांच्यासह संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

▪️प्रतिसरकारमधील कर्तृत्ववान स्त्रियांचा गौरव
चर्चासत्रात दिवसभरात प्रतिसरकार चळवळीतील कर्तृत्ववान स्त्रियांच्या सहभागाविषयी विविध सत्रांमध्ये संशोधनपूर्ण चर्चा झाली. स्त्रियांच्या योगदानाचा अत्यंत गौरवपूर्ण उल्लेख उपस्थित संशोधक व मान्यवरांनी केला. यामध्ये डॉ. पद्मजा पाटील, डॉ. कल्पना गुरव, प्रसाद कुलकर्णी, डॉ. प्रकाश पवार, डॉ. भारतभूषण माळी, डॉ. प्रकाश कुंभार, दमयंती पाटील, डॉ. दशरथ पारेकर, संपत मोरे, डॉ. दिनकर पाटील, विष्णू पावले, डॉ. अवनीश पाटील यांनी सहभाग घेतला. डॉ. भारती पाटील आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चासत्राचा समारोप झाला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes