SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सोमवारी ‘या’ कारणामुळे बालिंगा पंपिंग स्टेशन राहणार बंद!राज्य शासनाच्या विविध योजनांसह महापालिका स्वनिधीतून १६६ कोटी ९३ लाखांची रस्त्यांची कामे सुरूकोल्हापूर महानगर पालिका : बेकायदेशीर नळ कनेक्शन रितसर करण्यासाठी १० दिवसांची मुदत; त्यानंतर दंडात्मक व फौजदारी कारवाईदत्तवाडचे आरोग्यमंदिर लवकरच जनतेच्या सेवेत : आमदार यड्रावकर देवीदास मिसाळ, कृष्णा ठाकरे यांच्याविरोधात उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच येथे अवमान याचिका दाखलनवापूर येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय आढावा बैठक खुपिरेच्या बलमीम विकास संस्थेच्या संचालकावर कारवाई करावी अन्यथा आत्मदहन; सामाजिक कार्यकर्ते सरदार बंगे यांचा इशाराकोल्हापूरच्या अक्षय मानेचा बँकॉक हायरॉक्स स्पर्धेत डंका; आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा!प्रतिसरकारचे शोषणमुक्त समाजाचे स्वप्न ‘जेन-झी’ने साकारावे: डॉ. भारत पाटणकरडी. वाय. पाटील विद्यापीठ तळसंदेच्या २७१ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

जाहिरात

 

कोल्हापूर महानगर पालिका : बेकायदेशीर नळ कनेक्शन रितसर करण्यासाठी १० दिवसांची मुदत; त्यानंतर दंडात्मक व फौजदारी कारवाई

schedule14 Aug 26 person by visibility 235 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम, नियमित व सुरळीत करण्याच्या दृष्टीने पाणीपुरवठा विशेष समितीची पहिली सभा आज स्थायी समिती सभागृहात सभापती सौ.संगीता सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी शहरातील पाणीपुरवठा, पाण्याच्या टाक्या, बेकायदेशीर नळ कनेक्शन, गळती, जुन्या जलवाहिन्या, पाणीपट्टी वसुली, पंपिंग स्टेशन तसेच भविष्यातील पाणीपुरवठा नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

   शहरात जुन्या व नवीन अशा एकूण ३८ पाण्याच्या टाक्या असून, त्यांची नियमित देखभाल व स्वच्छता करण्यासाठी वार्षिक पद्धतीने कंपनीला ठेका देण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश सभापतींनी दिले. तसेच शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेतील गळती, दूषित अथवा घाण पाणी येत असलेल्या ठिकाणांचा शोध घेण्यासाठी महापालिकेकडे आलेल्या दोन रोबोंच्या सहाय्याने सोमवारपासून करण्याच्या सूचना दिल्या. शहरातील अनाधिकृत नळ कनेक्शन नियमित करण्यासाठी नागरिकांनी आपली कनेक्शन्स १० दिवसांच्या आत रितसर करून घ्यावीत. त्यानंतर महापालिकेच्या तपासणी पथकास बेकायदेशीर कनेक्शन आढळल्यास प्रथम २० हजार रुपये दंड आकारण्यात येईल. त्यानंतर संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील सुमारे १ लाख ४ हजार घरगुती पाणी कनेक्शन्स असून, पाणीपट्टीची सुमारे ४१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. पाणीपट्टी वसुलीला गती देण्यासाठी प्रत्येक वसुली कर्मचाऱ्यावर सुमारे १,५०० घरांचे बिल वाटप व वसुलीची जबाबदारी द्यावी. भविष्यात पाणीवापराचे अचूक मोजमाप व बिलिंगसाठी डिजिटल मीटर बसविण्याचा विचार सुरू असल्याचे बैठकीत पाणी पुरवठा विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

  पाणीपुरवठा करताना प्रभागनिहाय पाणी सोडण्याची वेळ निश्चित करून त्यानुसार नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच शहरातील जुन्या ड्रेनेज लाईन्सच्या दुरुस्तीसाठी डीपीआर तयार करण्याचे काम सुरू असून शासनाकडे याबाबत निधी मागणीसाठी प्रस्ताव पाठविण्याबाबतही चर्चा झाली.

 शहरातील जुन्या पंपिंग स्टेशनच्या दुरुस्ती व आधुनिकीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीकडे निधी मागणीचा प्रस्ताव तातडीने पाठविण्याचा निर्णय झाला. बालिंगा येथील पाणीपुरवठा व्यवस्था १९४६ साली, तर पुईखडी येथील व्यवस्था २००० साली उभारण्यात आली असून, या जुन्या यंत्रणांच्या दुरुस्ती व सक्षमतेकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे सदस्यांनी सांगितले. काळम्मावाडी येथे विद्युत सबस्टेशन उभारण्याबाबतचा प्रस्ताव प्रक्रियेत असून काळम्मावाडी पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्ती व देखभालीसाठी संबंधित कंपनीच्या कराराची मुदत केवळ दोन वर्षे शिल्लक असल्याने या कालावधीत महापालिका कर्मचाऱ्यांना आवश्यक तांत्रिक प्रशिक्षण देण्याबाबतही सूचना केल्या. शेंडा पार्क परिसरात दोन पाण्याच्या टाक्या तसेच STP प्लांट उभारण्याची आवश्यकता असून, त्याबाबत नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच पाणीपुरवठा व्यवस्थेच्या ऑटोमेशनसाठी सुमारे ३५ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून याबाबत पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक आयोजित करण्याचे यावेळी ठरले. भविष्यातील शहराची वाढती लोकसंख्या व पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन दीर्घकालीन नियोजन करण्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी पाणीपुरवठा विभागातील विविध प्रलंबित प्रश्न, पाणीपुरवठ्यातील अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

 यावेळी पाणीपुरवठा विशेष समिती उपसभापती दिपा काटकर, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, सदस्य अर्जुन माने, अजय इंगवले, माधूरी नकाते, स्वालिया बागवान, अर्चना बिरांजे, निलांबरी साळोंखे, जल अभियंता हर्षजीत घाटगे, शाखा अभियंता सुनिल भाईक, राजेंद्र हुजरे, जयेश जाधव, मयुरी पटवेगार, महानंदा सुर्यवंशी व कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes