SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आराजी वर्ग २ च्या जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनंदुरबारला ३ महिन्यांनंतर मिळाला 'धडाकेबाज' पालकमंत्री; हसन मुश्रीफांकडे जिल्ह्याची धुरा, राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम!आरोग्य उपकेंद्रातील अंशकालीन स्त्री परिचरांच्या मानधनात दुप्पट वाढ -आरोग्यमंत्र्यांचा महत्वपूर्ण निर्णयचैत्र यात्रेदरम्यान भाविकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी नको, सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावा : जिल्हाधिकारी अमोल येडगे‘गुलजार ए रजा’ संस्थेची एटीएसमार्फत चौकशी सुरू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदुधगंगा डावा कालवा गेट दुरुस्तीबाबत खुलासाशास्त्रीय गायकीतील सौंदर्य आणि संशोधन पद्धतीवर शिवाजी विद्यापीठात कार्यशाळा संपन्नदिव्यांग सुलभता मानकांबाबत विद्यापीठात २३ ला कार्यशाळाडॉ. सुचिता भोसले यांच्या कवितासंग्रहाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशनअंतराळात पहिले मानवी पाऊल: अलेक्सी लिओनोव्ह यांचा तो चित्तथरारक प्रवास!

जाहिरात

 

चैत्र यात्रेदरम्यान भाविकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी नको, सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावा : जिल्हाधिकारी अमोल येडगे

schedule18 Mar 26 person by visibility 114 categoryराज्य

▪️प्लास्टिक वापराबाबत कडक निर्बंध घालण्याच्या सूचना
▪️मंदिर व परिसर विकास आराखड्याबाबत ग्रामस्थांकडून आभार व्यक्त
▪️जोतिबा चैत्र पौर्णिमा यात्रेच्या नियोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न

कोल्हापूर : श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी येथे १ एप्रिल रोजी होणाऱ्या श्री जोतिबा देवाच्या चैत्र पौर्णिमा यात्रेच्या पूर्वतयारीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज होत असून, या पार्श्वभूमीवर बुधवारी १८ मार्च रोजी एका विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या प्रमुख उपस्थितीत जोतिबा डोंगरावरील यात्री निवास हॉल येथे दुपारी ४:०० वाजता ही बैठक पार पडली.  

या यात्रेसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमधून लाखो भाविक येत असल्याने यंदाचे नियोजन अधिक प्रभावीपणे आणि वेळेत करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. पन्हाळा प्रांताधिकारी समीर शिंगटे आणि तहसीलदार माधवी शिंदे यांनी यापूर्वीच सर्व विभागांना मागील वर्षीच्या यात्रेदरम्यान केलेल्या कामकाजाचा आणि कार्यवाहीचा सविस्तर आढावा दिला.  

बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष डोंगरावरील विविध ठिकाणांना भेटी देऊन पाहणी केली. यात्रेदरम्यान पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्लास्टिक वापराबाबत कडक निर्बंध घालण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, डोंगरावर स्वच्छता राखण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी पिण्याचे पाणी आणि शौचालय व्यवस्थेची ठिकठिकाणी सोय करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या. विशेषतः दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी दर्शन रांगांचे योग्य नियोजन करून त्या ठिकाणी सावली आणि पाण्याची व्यवस्था करण्याबाबत त्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून मार्गदर्शन केले. बैठकीत ग्रामस्थांकडून श्री. जोतिबा मंदिर व परिसर विकास आराखडा मंजुरी मिळाल्याबद्दल शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले. 

या बैठकीत प्रामुख्याने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन, आरोग्य सुविधांसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी व सीपीआर रुग्णालय, आणि प्रवासाच्या सुविधेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ व केएमटी परिवहन विभागाच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. त्याचप्रमाणे डोंगरावरील वीज पुरवठा, प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), आपत्ती व्यवस्थापन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांसारख्या यंत्रणांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, जिल्हा होमगार्ड, स्थानिक ग्रामपंचायत वाडीरत्नागिरी आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  

यात्रेदरम्यान भाविकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत आणि सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावा, यासाठी सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes