SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे अभिवादन सीपीआर मध्ये यशस्वी व्हेरिकोज वेन्स शस्त्रक्रिया; रुग्णसेवेत महत्त्वपूर्ण पाऊल“फुलेंचा सार्वजनिक सत्यधर्म हा मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा” : प्राचार्य डॉ. जी. पी. माळीकोल्हापुरात १४ एप्रिल रोजी दसरा चौक मैदानावर प्रबोधन महासभेचे आयोजन मतदार यादी पुनरनिरीक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी झोकून काम करावे : आ. सुहास बाबरराधानगरीत रानगव्याच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यूआर्थिक साक्षरता काळाची गरज : डॉ. उदयकुमार शिंदेघोडावत ऑलिम्पियाड स्कूलचे डॉ.होमी भाभा परीक्षेत यशसंघटन सृजन अभियाना अंतर्गत काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यात 13 एप्रिल ते 18 एप्रिल कालावधीत आढावा बैठका होणारडॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये 'भारतीय वायुदलातील करिअर संधी ' विषयावर मार्गदर्शन; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जाहिरात

 

सामाजिक क्रांतीचे दीपस्तंभ : महात्मा जोतीराव फुले

schedule11 Apr 26 person by visibility 132 categoryसामाजिक

भारताच्या सामाजिक इतिहासात ११ एप्रिल हा दिवस केवळ एका महापुरुषाच्या जन्माचा दिवस नाही, तर समता, शिक्षण आणि मानवतेच्या नव्या युगाची सुरूवात करणारा दिवस आहे.महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांच्या जन्मामुळे भारतीय समाजव्यवस्थेला नवी दिशा मिळाली. सन १८२७ मध्ये जन्मलेल्या या युगपुरुषाच्या विचारांचा प्रकाश आजही समाजाच्या प्रत्येक स्तरावर जाणवतो. ११ एप्रिल पासून महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे केले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात द्विशताब्दी जयंती समिती स्थापन केल आहे.समाजातील समता, शिक्षण, स्त्री-सक्षमीकरणांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचा राज्य सरकारने संकल्प केला आहे.त्यामुळे ११ एप्रिलचा दिवस भारताच्या सामाजिक समतेच्या तेजस्वी द्विशताब्दी पर्वाचा दिवस म्हणूनही देशात साजरा होत आहे.त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्याचा पुनर्विचार करणे म्हणजे केवळ इतिहासाचे स्मरण नसून वर्तमानाला दिशा देण्याचे कार्य आहे.

◼️मानवतेचा धर्म : समतेचा मूलाधार
महात्मा फुले यांच्या विचारविश्वाचा केंद्रबिंदू म्हणजे “मानव हा सर्वात मोठा धर्म आहे” ही भूमिका. त्यांनी धर्म, जात, पंथ यापलीकडे जाऊन माणुसकीचा विचार मांडला. त्यांच्या लेखनात आणि कृतीतून सतत दिसून येते की, समाजातील अन्याय आणि विषमता दूर केल्याशिवाय खरी प्रगती होऊ शकत नाही. त्यांनी मांडलेली समतेची संकल्पना ही केवळ तात्त्विक नव्हती, तर ती प्रत्यक्ष कृतीतून साकारलेली होती.

◼️शिक्षणाची ज्योत : अज्ञानातून मुक्तीचा मार्ग
महात्मा फुले यांनी घेतलेला सर्वात क्रांतिकारी निर्णय म्हणजे शिक्षणाचा प्रसार. त्यांनी प्रथम स्वतःच्या पत्नीला सावित्रीबाई फुले यांना शिक्षित केले आणि त्यानंतर १८४८ मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. सावित्रीबाईंनीही समाजाच्या विरोधाला न जुमानता स्वतःला शिक्षणासाठी वाहून घेतले. शेण गोट्याचा मार सहन करत सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. जोतीबा आणि सावित्री या दांपत्याच्या त्या काळातील सामाजिक बंडामुळे शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली झाली.त्या काळात स्त्रीशिक्षणाला तीव्र विरोध असतानाही त्यांनी मागे हटणे स्वीकारले नाही. शिक्षण हेच शोषणाविरुद्धचे सर्वात प्रभावी शस्त्र आहे, ही त्यांची धारणा होती. या कार्यातून त्यांनी समाजातील अज्ञानाची बेडी तोडण्याचा प्रयत्न केला.अविद्या हेच शोषणाचे मुख्य कारण आहे हे सांगताना त्यांनी समाजाला याबाबतचा कठोर संदेश दिला...

विद्येविना मती गेली
मतीविना नीती गेली
नितीविना गती गेली

गती विना वित्त गेले
वित्तविना शूद्र खचले
इतके अनर्थ एका अविद्येने केले...

◼️अन्यायाविरुद्ध बंड
त्या काळातील समाज रुढी-परंपरांच्या कठोर बंधनात अडकलेला होता. बालविवाह, सतीप्रथा, स्त्रीदास्य आणि अस्पृश्यता यांसारख्या प्रथांनी समाजाला जखडून ठेवले होते. महात्मा फुले यांनी या सर्व प्रथांविरुद्ध उघडपणे आवाज उठवला. त्यांनी विधवांसाठी आश्रयस्थळे उभारली, विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले आणि स्त्रियांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. त्यांच्या कृतीतून समाजातील महिलांना अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा मिळाली.

◼️सत्यशोधकांचा मार्ग : समतेची संघटित चळवळ
सन १८७३ मध्ये त्यांनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज हा भारतीय सामाजिक इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला.या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जातीभेद,अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमता यांविरुद्ध संघटित लढा उभारला. सत्यशोधक समाजाने समाजाला विचार करण्याची नवी दिशा दिली. ज्यामध्ये सत्य, समता आणि बंधुता यांना केंद्रस्थानी ठेवले आहे.सत्यशोधक समाजाच्या मार्फत त्यांनी एक समांतर विज्ञानवादी भूमिका समाजापुढे मांडली.तत्कालीन ब्राह्मण्यवादाला झुगारून नव्या चालीरीती समाजाला दिल्या.

◼️शेतकऱ्यांचा आवाज : अन्यायाविरुद्धचा प्रहार
महात्मा फुले यांनी केवळ सामाजिकच नव्हे, तर आर्थिक विषमतेवरही भाष्य केले.त्यांच्या “शेतकऱ्यांचा आसूड” या ग्रंथात त्यांनी शेतकऱ्यांच्या दुःखाचे अत्यंत वास्तव चित्रण केले आहे. महसूल व्यवस्थेतील अन्याय, सावकारशाहीचे शोषण आणि प्रशासनातील दुर्लक्ष यावर त्यांनी कठोर टीका केली. शेतकरी हा समाजाचा कणा असूनही त्याचे जीवन दारिद्रयात का अडकले आहे, हा प्रश्न त्यांनी समाजासमोर उभा केला.

◼️विचारांची शस्त्रे : लेखनातून घडवलेले परिवर्तन
महात्मा फुले हे केवळ कृतीशील समाजसुधारक नव्हते, तर प्रभावी लेखकही होते. “गुलामगिरी” या ग्रंथातून त्यांनी जातीव्यवस्थेवर प्रखर प्रहार केला, तर “सार्वजनिक सत्यधर्म” मधून मानवतावादी धर्माची संकल्पना मांडली. त्यांच्या लेखनातून समाजाच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे कार्य झाले. यातून त्यांच्या विचारांची व्यापकता स्पष्ट होते.याशिवाय त्यांनी गुलामगिरी,शेतकऱ्यांचा आसूड,ब्राह्मणांचे कसब, तृतीय रत्न,सार्वजनिक सत्य धर्म,छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडा लिहून शिवरायांच्या कार्यकर्तुत्वाची ओळख करून दिली.रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या समाधीची स्वच्छता केली.शिवाजी महाराजांच्या स्मृती पुनरुज्जीवनाच्या प्रारंभीच्या प्रयत्नांपैकी एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व त्यांना मानले जाते.

◼️सार्वजनिक जीवनातील योगदान
महात्मा फुले यांनी सार्वजनिक जीवनातही सक्रिय सहभाग घेतला. पुणे महानगरपालिकेच्या कार्यातून त्यांनी नागरी प्रश्नांवर काम केले. पाणीपुरवठा, स्वच्छता आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे त्यांनी लक्ष दिले. त्यांनी ब्रिटिश प्रशासनाशी संवाद साधून सामाजिक प्रश्न मांडले आणि वंचित घटकांसाठी न्यायाची मागणी केली. शासन कोणतेही असो, ते न्याय्य आणि लोकहितकारी असले पाहिजे, ही त्यांची भूमिका होती.हंटर शिक्षण आयोगाकडे त्यांनी निवेदन सादर केले.सार्वत्रिक शिक्षणाचा पुरस्कार केला.

 
✍️ प्रवीण टाके
उपसंचालक (माहिती), 
विभागीय माहिती कार्यालय,कोल्हापूर

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes