कोल्हापुरात स्वामी अभेदानंदजींची व्याख्यानमाला; 'गीतेतील भक्ती, शक्ती आणि मुक्ती' विषयावर होणार प्रबोधन
schedule01 Apr 26 person by visibility 314 categoryसामाजिक
कोल्हापूर : येथील चिन्मय सेवा समितीच्या वतीने चिन्मय मिशनचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वक्ते स्वामी अभेदानंदजी यांच्या विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, ३ एप्रिल ते बुधवार, ८ एप्रिल २०२६ या कालावधीत सायंकाळी ६:३० ते ८:०० या वेळेत ही व्याख्यानमाला रंगणार आहे. 'गीतेतील भक्ती, शक्ती आणि मुक्ती' हा या कार्यक्रमाचा मुख्य विषय असून, प्रतिभा नगर येथील 'चिन्मय पुष्पांजली' (आजरा बँकेसमोर) येथे हे आयोजन करण्यात आले आहे.
या व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. स्वामी अभेदानंदजी गेल्या ३० वर्षांपासून जगभरात वेदांत, योग आणि भारतीय संस्कृतीचा प्रसार करत आहेत. त्यांनी दक्षिण आफ्रिकेत सहा आश्रम आणि दोन मंदिरे उभारली असून, त्यांच्या कार्याची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे.
मुख्य व्याख्यानमालेसोबतच शनिवार, ४ एप्रिल ते बुधवार, ८ एप्रिल दरम्यान सकाळी ८ ते ९ या वेळेत 'वेदांताचा जीवनात उपयोग' या विषयावरही स्वामीजी मार्गदर्शन करणार आहेत. ही व्याख्यानमाला सर्वांसाठी खुली असून प्रवेश विनामूल्य आहे. या ज्ञानाचा कोल्हापूरकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन चिन्मय मिशनतर्फे करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेला चिन्मय मिशन कोल्हापूरचे प्रभारी स्वामी दत्तराजानंद, डॉ. वासुदेव देशिंगकर, स्नेहल कारंडे, मेघा जोशी आणि अभय मगदूम उपस्थित होते.