राधानगरी तालुक्यातील अवसायनात संस्थांच्या सुनावणीस गती द्या : अभिजीत तायशेटे, संचालक, गोकुळ दूध संघ
schedule20 Apr 26 person by visibility 180 categoryउद्योग
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) कडे दूध पुरवठा करणाऱ्या सुमारे ११०० हून अधिक संस्थांबाबत तक्रारीनंतर मध्यंतरी अवसादनाचे आदेश देण्यात आले असून संबंधित संस्थांची पात्रता तपासणी व सुनावणी प्रक्रिया सुरू आहे. मात्र राधानगरी व शाहूवाडी तालुक्यातील अनेक संस्थांना अद्याप सुनावणीसाठी नोटीस मिळालेली नसल्याचे समोर आले आहे.
याबाबत संदर्भात गोकुळ दूध संघाचे संचालक अभिजीत तायशेटे यांनी कोल्हापूर सहाय्यक निबंधक (दुग्ध),चे कृष्णा ठाकरे यांना ताराबाई पार्क येथील कार्यालयामध्ये निवेदन देऊन लक्ष वेधले आहे. निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, अनेक संस्थांना आपले लेखी म्हणणे सादर करण्यासाठी अद्याप बोलावले गेलेले नाही. तसेच काही तालुक्यांतील संस्थांना नोटीस देऊनही प्रत्यक्ष सुनावणी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
त्यामुळे ज्या संस्थांना अद्याप नोटीस प्राप्त झालेली नाही, त्यांना तातडीने नोटीस देण्यात यावी, तसेच ज्या संस्थांची सुनावणी प्रलंबित आहे ती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून संबंधित संस्थांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
सदर प्रक्रियेमुळे अनेक दूध उत्पादक संस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून पारदर्शकपणे निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यावेळी राधानगरी तालुक्यातील दूध संस्था प्रतिनिधी उपस्थिती होते.