दीड वर्षांपासून रखडले काम; उचगाव-गडमुडशिंगी रस्त्यासाठी शिवसेना मैदानात!
schedule20 Apr 26 person by visibility 179 categoryसामाजिक
कोल्हापूर: उचगाव ते गडमुडशिंगी दरम्यान शेतवडीतून जाणाऱ्या महत्त्वाच्या पाणंद रस्त्याचे काम गेल्या दीड वर्षांपासून रखडल्याने, करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या रस्त्याचे खडीकरण पूर्ण होऊन मोठा काळ लोटला असूनही डांबरीकरण करण्यात आलेले नाही. या प्रलंबित कामामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि प्रवाशांचे प्रचंड हाल होत असल्याने, प्रशासनाने तातडीने डांबरीकरण करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
उचगाव हायवे पुलाखालील 'गोल्डस्टार' परिसरात वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे, गडमुडशिंगीकडे जाणारी बहुतांश वाहतूक या पाणंद रस्त्यावरून वळवली जाते. तसेच या मार्गावर न्यू पॉलिटेक्निक कॉलेज असल्याने विद्यार्थी व शिक्षकांची मोठी वर्दळ असते. मात्र, रस्ता अर्धवट स्थितीत असल्याने वाहनधारकांना धुळीचा आणि खडबडीत मार्गाचा सामना करावा लागत आहे. हीच बाब लक्षात घेऊन करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदनाद्वारे जाब विचारला.
संबंधित अधिकारी कार्यालयात नसल्याने लेखाधिकारी प्रदीप सकटे यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी त्यांनी संबंधित विभागाला सूचना देऊन तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी बाळासाहेब नलवडे, योगेश लोहार, कैलास जाधव, दत्ता फराकटे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास शिवसेना आपल्या स्टाईलने तीव्र आंदोलन छेडेल, असा स्पष्ट संदेश यावेळी देण्यात आला.