कोल्हापुरातील सीमा आलमेलकर ठरल्या पैठणीच्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी
schedule15 Feb 26 person by visibility 74 categoryसामाजिक
कोल्हापूर : भिमा कृषी प्रदर्शनामध्ये झालेल्या भागीरथी महिला संस्थेच्यावतीने आयोजित होम मिनिस्टर स्पर्धेत, कोल्हापुरातील सीमा आलमेलकर यांनी प्रथम क्रमांक पटकावत, पैठणीच्या मानकरी ठरल्या. त्याशिवाय अन्य ११ स्पर्धकांनाही, भागीरथी संस्थेच्यावतीने पैठणी देण्यात आली. महिलांमधील निर्णय क्षमता, समयसूचकता आणि कौशल्य विकासाला चालना देणार्या खेळ पैठणीचा या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला.
कोल्हापुरातील मेरी वेदर मैदानावर भिमा कृषी प्रदर्शन सुरु आहे. त्याअंतर्गत भागीरथी महिला संस्थेच्यावतीने, होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केला होता. भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.
खासदार धनंजय महाडिक, चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, राजेश देशमुख, वैष्णवी महाडिक, अंजली महाडिक यांनी स्पर्धास्थळी भेट दिली. खेळ पैठणीचा अंतर्गत झालेल्या कार्यक्रमाला, महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला. संतोष वडर यांनी बहारदार निवेदन आणि सूत्रसंचालन केले. महिलांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा झाल्या. कौशल्य, अचूकता, निर्णय क्षमता, हजरजबाबीपणा, समयसूचकता, विविधांगी खेळ अशा प्रकारात, खेळ पैठणी अंतर्गत निवड चाचणी झाली.
या स्पर्धेत कोल्हापुरातील सीमा आलमेलकर यांनी विजेतेपद पटकावले. आलमेलकर यांना सौ. अरुंधती महाडिक आणि वैष्णवी महाडिक यांच्या हस्ते पैठणी देऊन गौरवण्यात आले. खेळ पैठणीचा स्पर्धा जिंकल्यानंतर सीमा आलमेलकर यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली. या स्पर्धेत पल्लवी तपासे यांना दुसरा क्रमांक मिळाला. त्याशिवाय अन्य १० स्पर्धकांनाही पैठणी देण्यात आली. त्यामध्ये तृप्ती खाडे, प्राची जाधव, अश्विनी कदम, अनिता गिरी, पूजा वाडकर, शारदा लोहार, युगंधरा वाळवेकर, अवनि बिरंबोळे, शिल्पा फाळके आणि सायली सावंत यांनाही पैठणी देण्यात आली.