कोल्हापुरात मोठी कारवाई: ७ किलो अफू पावडरसह राजस्थानी इसम गजाआड; १ लाखाचा मुद्देमाल जप्त
schedule18 Sep 26 person by visibility 299 categoryगुन्हे
कोल्हापूर : सध्या महाराष्ट्रसह संपूर्ण भारतात 'नशामुक्त भारत अभियान' वेगाने राबवले जात आहे. या अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल (भा.पो.से.) यांनी अवैध अंमली पदार्थांचा साठा व विक्री करणाऱ्या तस्करांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत कणेरीवाडी येथे ७ किलो अफूच्या पावडरसह एका राजस्थानी इसमाला गजाआड केले आहे.
पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल व अपर पोलीस अधीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी विशेष पथके स्थापन केली होती. दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांचे पथक कणेरीवाडी परिसरात गस्त घालत असताना, पथकातील पोलीस अंमलदार प्रवीण पाटील यांना एका बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली की, कणेरीवाडी येथील बालाजीनगर परिसरातील एका इमारतीत एक इसम अफूची पावडर तयार करून त्याची विक्री करत आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७:१५ वाजण्याच्या सुमारास कणेरीवाडी येथील बालाजीनगरमधील एका आर.सी.सी. इमारतीच्या वरील खोलीवर अचानक छापा टाकला.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपी सागरराम भागीरथराम डारा (वय ३०, धंदा: ट्रान्सपोर्ट, सध्या रा. बालाजीनगर, कणेरीवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर, मूळ रा. आटीया, ता. भुपालगड, जि. जोधपुर, राजस्थान) यास ताब्यात घेतले. त्याच्या खोलीची झडती घेतली असता, तिथे सुमारे ७ किलो ग्रॅम वजनाची अफूची तयार पावडर आणि इतर साहित्य, असा एकूण १,००,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला.
पोलिसांनी पंचांसमक्ष कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गोकुळशीरगाव पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीने हा अफूचा साठा कोठून आणि कोणाकडून आणला होता, याबाबतचा सखोल तपास सध्या गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे.
सदरची ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अन्նसासाहेब जाधव, व उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, आणि पोलीस अंमलदार प्रवीण पाटील, दीपक घोरपडे, अरविंद पाटील, अशोक पोवार, सतीश सूर्यवंशी व संजय हुंबे यांच्या पथकाने पार पाडली आहे.