डॉ. जे. बी. शिंदे यांच्या दोन ग्रंथांचे प्रकाशन
schedule28 Jun 26 person by visibility 132 categoryसामाजिक
कोल्हापूर : स्मृतिशेष प्रा. डॉ. जे. बी. शिंदे यांच्या संत तुकारामांची आक्रोशगाथा आणि एज्युकेशनल थॉट्स अॅंड वर्क ऑफ शाहू महाराज या दोन ग्रंथांचे प्रकाशन नुकतेच घाटगे हॉल, देवल क्लब येथे मान्यवरांच्या हस्ते झाले. शिक्षणतज्ज्ञ डॉ. भगवान हिर्डेकर आणि शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे हे प्रमुख पाहुणे होते. ज्येष्ठ पत्रकार, लेखक, कवी श्रीराम पचिंद्रे हे अध्यक्ष होते.
सामाजिक समता आणि शोषणाविरुद्ध लढा हे महापुरुषांच्या साऱ्या विचार आणि कार्याचे सूत्र होते. ज्ञान, समाजप्रबोधन आणि परिवर्तनवादी विचार हेच महापुरुषांचे कार्य डॉ. जे. बी. शिंदे यांनी समर्थपणे पुढे नेले, असे श्रीराम पचिंद्रे म्हणाले.
यावेळी 'संत तुकारामांची आक्रोशगाथा' या ग्रंथाविषयी डॉ. रणधीर शिंदे यांनी, तर 'एज्युकेशनल थॉट्स अॅंड वर्क ऑफ शाहू महाराज' या ग्रंथाविषयी डॉ. भगवान हिर्डेकर यांनी विवेचन केले.
स्वागत व प्रास्ताविक डॉ. रघुनाथ ढमाकले यांनी, डॉ. शिंदे यांच्या कार्याचा परिचय विशाखा जितकर यांनी, पाहुण्यांचा परिचय डॉ. जी. पी. माळी यांनी करून दिला. आरंभी प्रतिमापूजन झाले. प्रकाशक सुरेश शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ बालसाहित्यिक बाबुराव शिरसाट यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. डॉ. रमेश जाधव, डॉ. सुभाष देसाई, प्रभाकर तांबट, सुहास राजेभोसले इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते. डॉ. राजेंद्र यादव यांनी आभार मानले, तर अश्विनी वागरे यांनी सूत्रसंचालन केले.