SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
प्लास्टिक, अस्वच्छता व उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर महापालिकेची कारवाई; उपद्रव शोध पथकामार्फत 465 व्यक्तींकडून 3 लाख 72 हजारांचा दंड वसूलराधानगरी धरण 100 टक्के भरले; जिल्ह्यातील 12 बंधारे पाण्याखालीडेंग्यू, चिकनगुनिया प्रतिबंधासाठी महापालिकेची युद्धपातळीवर उपाययोजनाडी वाय पाटील अभियांत्रिकीच्या डेटा सायन्स विभागाला आघाडीच्या कंपन्यांची पसंतीसर्किट बेंचने अवसायनातील दूध संस्था केल्या पात्र; अवसायनातील सर्वच दूध संस्थांच्या मतदानाचा मार्ग मोकळा15 ऑगस्टला इचलकरंजीत मोफत 'बिग चेस इंडिपेंडन्स कॅम्प 2026बहुजनांच्या हाताला रोजगार आणि उद्योजक बनवणारी एमआयडीसी उभारण्यात यशस्वी व्हा..'वारणा' ची म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर दीड रुपया तर गाय दुधास १ रुपया दरवाढ ; आमदार डॉ. विनय कोरे यांची माहितीतरुणांची ऊर्जा आणि देशाचे भविष्य: आंतरराष्ट्रीय युवा दिनलिंगायत समाजाच्या मागण्यांना शासनाचा सकारात्मक प्रतिसाद; प्रशासकीय प्रक्रियेला सुरुवात

जाहिरात

 

डेंग्यू, चिकनगुनिया प्रतिबंधासाठी महापालिकेची युद्धपातळीवर उपाययोजना

schedule12 Aug 26 person by visibility 73 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर शहरातील विविध भागांत डेंग्यू प्रतिबंधक सर्वेक्षण; 33 डेंग्यू व 17 चिकनगुनिया रुग्णांची नोंद

कोल्हापूर : पावसाळी हंगामात डासांद्वारे होणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्यात येत आहेत. नागरिकांनीही खबरदारी घेऊन आपल्या घरासह परिसरात पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभाग व आरोग्य निरीक्षकांमार्फत शहरातील रामकृष्ण इंगवले, देवकर पाणंद, सरदार तालीम, फिरंगाई मंदिर, मातंग वसाहत, सह्याद्री हौसिंग सोसायटी, देशपांडे गल्ली, गंजी गल्ली, शनिवार पेठ, बीडी कामगार वसाहत, अंबाई टँक, जरगनगर, हनुमान नगर, राजारामपुरी, यादव नगर, दौलतनगर, जागृती नगर, सम्राट नगर, शास्त्रीनगर, पांजरपोळ, जामदार क्लब, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ, ब्रह्मपुरी, तोरस्कर चौक, कसबा बावडा, पिंजार गल्ली, लाईन बाजार, कनाननगर, नागाळा पार्क, विक्रमनगर, टाकाळा, शिवाजीपेठ, शाळा नं. 8, बाबुजमाल, तटाकडील तालीम, राजाराम चौक, मरंगाई मंदिर, आपटेनगर, न्यू वाशी नाका, राजलक्ष्मी नगर, साळोखेनगर, कणेरकर नगर, गोळीबार मैदान, सुर्वेनगर, मनोरमा नगर, निकम पार्क, नवनाथनगर, महाडीक माळ, उत्तरेश्वर पेठ, दुधाळी, शाहूनगर, रेव्हेन्यू कॉलनी, ताराराणी कॉलनी, इंद्रजित कॉलनी, घाडगे कॉलनी, लोणार वसाहत तसेच शाळा नं. 2 फिरंगाई परिसरात डेंग्यू प्रतिबंधक सर्वेक्षण करण्यात आले.

या सर्वेक्षणादरम्यान घरातील पाण्याचे साठे, कूलर, पाण्याच्या टाक्या, टाकाऊ भांडी, टायर, फुलदाण्या तसेच ओल्या कचऱ्याचे ढीग आदींची तपासणी करण्यात आली. डासोत्पत्तीची ठिकाणे आढळून आलेल्या ठिकाणी तातडीने औषध व कीटकनाशक फवारणी करण्यात आली. तसेच संशयित भागांमध्ये धूर फवारणी आणि नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात येत आहे. जून ते ऑगस्ट 2026 या कालावधीत शहरात 33 डेंग्यू आणि 17 चिकनगुनिया रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. महापालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रांमध्ये डेंग्यूची चाचणी व उपचाराची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस ‘ड्राय डे’ पाळावा. घरातील पाण्याचे साठे, कूलर, पाण्याच्या टाक्या रिकाम्या करून स्वच्छ कराव्यात. घराच्या आजूबाजूला, गच्चीवर, टायर, नारळाच्या करवंट्या किंवा इतर वस्तूंमध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. नागरिकांनी संपूर्ण अंग झाकणारे कपडे वापरावेत तसेच डास प्रतिबंधक साधनांचा वापर करावा. ताप, अंगदुखी, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे आदी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तातडीने जवळच्या नागरी आरोग्य केंद्रात किंवा शासकीय रुग्णालयात जाऊन मोफत तपासणी करून घ्यावी. स्वतःहून औषधे घेऊ नयेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पॅरासिटामॉलशिवाय इतर औषधे घेऊ नयेत. नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती दक्षता घ्यावी आणि डेंग्यू प्रतिबंधाच्या उपाययोजनांमध्ये महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes