जयसिंगपूर रेल्वे उड्डाणपुलासाठी ५५ कोटींचा निधी मंजूर : आमदार यड्रावकर
schedule27 Jul 26 person by visibility 162 categoryराज्य
◼️उमळवाड, कोथळी, दानोळी कवठेसार, जैनापूर, निमशिरगाव, कुंभोज, तीर्थक्षेत्र बाहुबलीसह परिसरातील गावांचा प्रश्न मार्गी
जयसिंगपूर : जयसिंगपूर पलीकडील अनेक गावातील नागरिकांच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या जिव्हाळ्याच्या प्रश्न अखेर मार्गे लागला आहे. जयसिंगपूर येथील रेल्वे उड्डाणपुलासाठी ५५ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या बैठकीत या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा बहुप्रतिक्षित प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
रेल्वे फटकामुळे दिवसातून अनेक वेळा वाहतूक ठप्प होत असल्याने
जयसिंगपूर पलीकडील उमळवाड, कोथळी, दानोळी कवठेसार, जैनापूर, निमशिरगाव, कुंभोज, तीर्थक्षेत्र बाहुबली सह परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.
रेल्वे फाटक बंद होत असल्याने रुग्णवाहिका, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी तसेच शेतकऱ्यांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत होती. विशेषतः गंभीर रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचविणे, शिक्षणासाठी दररोज प्रवास करणारे विद्यार्थी, नोकरीसाठी ये-जा करणारे कर्मचारी आणि शेतमालाची वाहतूक करणारे शेतकरी यांना या रेल्वे फाटकामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे या उड्डाणपुलाच्या मंजुरीमुळे वैद्यकीय सेवा, शिक्षण, नोकरदार वर्ग आणि शेतकरी यांना सर्वाधिक दिलासा मिळणार आहे.
हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार मंत्रालयात झालेल्या बैठकीत रेल्वे उड्डाणपुलासाठी ५५ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित, जलद आणि सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीस जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग नोंदविला.
उड्डाणपुलाला प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर जयसिंगपूर, कोथळी आणि परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून, दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे आभार मानले जात आहेत.
या उड्डाणपुलाच्या उभारणीनंतर रेल्वे फाटकावरील वाहतूक कोंडी कायमची संपुष्टात येणार असून, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, विद्यार्थ्यांचा प्रवास, नोकरदारांची वेळेची बचत आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीला मोठी गती मिळणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प केवळ उड्डाणपूल नसून परिसराच्या विकासाला चालना देणारा आणि हजारो नागरिकांना दिलासा देणारा महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्प ठरणार आहे.