८ ऑगस्टपर्यंत गणना अर्ज भरून बीएलओकडे जमा करण्याचे आवाहन
schedule27 Jul 26 person by visibility 132 categoryराज्य
◼️विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत १७ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार; अंतिम यादी १९ ऑक्टोबर रोजी
मुंबई : महाराष्ट्र राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू असून, सध्याच्या मतदार यादीतील सर्व मतदारांनी ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत गणना अर्ज भरून त्यावर स्वाक्षरी करून गृहभेटीस येणाऱ्या संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.
वेळेत गणना अर्ज भरून सादर करणाऱ्या मतदारांची नावे १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत.
प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांना तसेच नवमतदारांना १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नमुना क्रमांक ६ (आवश्यक घोषणापत्र व कागदपत्रांसह) भरून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. संबंधित मतदार नोंदणी अधिकारी अर्जांची पडताळणी करून पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करतील.
दावे व हरकतीच्या या कालावधीत मतदारांना नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना ६, नोंदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नमुना ८ भरता येणार आहे. तसेच संबंधित मतदारसंघातील कोणताही मतदार मतदार यादीतील कोणतीही नोंद वगळण्यासाठी नमुना ७ भरून हरकत नोंदवू शकतो.
मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करताना चुकीची घोषणा अथवा खोटी माहिती दिल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम ३१ नुसार संबंधित व्यक्तीस एक वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
राज्यातील अंतिम मतदार यादी १९ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम २२ व २३ नुसार अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही पात्र नागरिकांना नाव समाविष्ट करणे किंवा नोंदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी विहित नमुना क्रमांक ६ द्वारे अर्ज करता येणार आहे. मतदार यादीचे अद्ययावतीकरण ही निरंतर प्रक्रिया असून, कोणत्याही निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत अशा सुधारणा करता येतात, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.