इचलकरंजी, हातकणंगले भागातील संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा : जिल्हाधिकारी अमोल येडगे
schedule20 May 25 person by visibility 247 categoryराज्य

• संभाव्य पूरबाधित निलेवाडी, जुने पारगाव तसेच निवारा केंद्राला भेट देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी*
• पूर परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन नागरिकांनी सहकार्य करावे
• रस्ते व पुलावरील पुराच्या पाण्यात नागरिक गेल्यास दुर्घटना घडू नये, यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करा
• निवारा केंद्रे व चारा छावण्या तयार ठेवा; स्थलांतरित नागरिकांना आवश्यक त्या सुविधा देण्यासाठी चोख नियोजन करा
कोल्हापूर : मान्सून कालावधीत इचलकरंजी, हातकणंगले भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास ती हाताळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करुन त्यानुसार कार्यवाही करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.
वारणा व पंचगंगा नदी काठावरील निलेवाडी, जुने पारगाव, किणी, घुणकी, भादुले, वाठार, खोची, चावरे, पट्टणकोडोली, रुई, इंगळी, चंदूर, रांगोळी, इचलकरंजी आदी संभाव्य पूरबाधित भागांबाबत तालुका प्रशासनाने व इचलकरंजी महानगरपालिकेने केलेल्या तयारीची आढावा बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली इचलकरंजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात घेण्यात आली. तत्पूर्वी हातकणंगले तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण होणाऱ्या निलेवाडी, जुने पारगाव येथील ठिकाणांना त्यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच वारणा उद्योग समूह येथील पूरबाधित नागरिकांसाठीच्या संभाव्य निवारा केंद्राची पाहणी केली.
यावेळी उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले, इचलकरंजी मनपा आयुक्त पल्लवी पाटील, पोलीस उपअधीक्षक समीरकुमार साळवे, तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर, अपर तहसीलदार सुनील शेरखाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, हातकणंगले, इचलकरंजी भागात आतापर्यंत निर्माण झालेली पूर परिस्थिती, दरवर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यातील सरासरी पाऊस, पुरादरम्यान वारणा व पंचगंगा नदीची पाणीपातळी, स्थलांतरित करावे लागणाऱ्या नागरिक व जनावरांची माहिती, पुरामुळे बाधित होणारे नागरिक, शेती, रस्ते, घरे, पूल, तसेच त्यांचे होणारे नुकसान ही सर्व माहिती तयार ठेवा. पुराने वेढा पडणाऱ्या गावांची नावे व या गावांमध्ये द्याव्या लागणाऱ्या सोयी सुविधा याची माहिती तयार ठेवा. मान्सून कालावधीत अतिवृष्टी झाल्यास नदीच्या वाढणाऱ्या पाणी पातळीचा अंदाज घेऊन नागरिकांचे वेळेत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा. धरणांमधून पाण्याचा विसर्ग होण्यापूर्वी नदीकाठच्या नागरिकांना सतर्क करा. पुराच्या पाण्यात नागरिक अडकणार नाहीत, याची खबरदारी घ्या. पाणी पुरवठा व वीज पुरवठा खंडित झाल्यास त्वरित पूर्ववत करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व साधनसामग्री तयार ठेवा.
आपत्कालीन विभागाने सर्व साधनसामग्री व स्वयंसेवकांची पथके तसेच नागरिकांना पूरस्थितीतून बाहेर काढण्यासाठी प्रशिक्षित बचाव पथके सज्ज ठेवावीत. मान्सून काळात रस्ते व पूल पाण्याखाली जातात, अशावेळी नागरिकांकडून पूल ओलांडताना दुर्घटना घडू नये, यासाठी पुराचे पाणी आलेले रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करा व या मार्गावरील वाहतूक तात्काळ पर्यायी मार्गाने वळवा. रस्ते व पुलावर पाणी आल्यास त्यातून नागरिकांनी पुराच्या पाण्यात जाऊ नये तसेच वाहन चालवू नये, असे आवाहन करुन रस्ते व पुलावरील पुराच्या पाण्यात नागरिक गेल्यास दुर्घटना घडू नये, यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करा, अशा सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी यावेळी दिल्या.
पूर परिस्थितीमुळे पाण्याचा वेढा पडण्याची शक्यता असणाऱ्या गावांना मदतकार्य जलद पोहोचवा. स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांना आवश्यक त्या सोयी सुविधा वेळेत द्या. यासाठी पुरेसे अन्नधान्य व औषधसाठा उपलब्ध ठेवा. पूरस्थिती निर्माण झाल्यास कोणत्याही परिस्थितीत जीवित हानी होवू नये. तसेच एकही जनावर वाहून जाऊ नये, यासाठी चोख नियोजन करा. निवारा केंद्रातील नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, चहा, नाश्ता, जेवणाची सोय, औषध साठा तसेच छावणीतील जनावरांसाठी पुरेसे पशुखाद्य, ओला व सुका चारा, औषधसाठा तयार ठेवा. पूर परिस्थिती उद्भवल्यास आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी चोख नियोजन करा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी येडगे यांनी केल्या.
उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले यांनी व संबंधित अधिकाऱ्यांनी तालुका निहाय व गाव निहाय केलेल्या आपत्ती व्यवस्थापन नियोजनाची माहिती दिली.